Chikungunya Symptoms: डासांमुळे अनेक आजार पसरतात. अनेकदा साधे वाटणारे हे आजार जीवघेणेही ठरतात. डेंग्यू (Dengue), मलेरिया (Malaria) सोबतच चिकनगुनियाही (Chikungunya) डासामुळे होतो. ज्या व्यक्तीला चिकनगुनियाची लागण होते, त्यावेळी सुरुवातीला ताप आणि सर्दीसारखी लक्षणं दिसतात. मात्र, हा आजार थेट रुग्णाच्या हाडांवर हल्ला चढवतो. चिकनगुनिया झालेल्या रुग्णाला ताप, सर्दी, खोकला, अंगदुखीसोबतच हाडांमध्ये वेदना जाणवतात. काही दिवसांपूर्वी द लॅन्सेट इन्फेक्शियस डिसीज जर्नलमध्ये चिकुनगुनियाबाबत एक संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. त्यानुसार, चिकनगुनियाचा संसर्ग झालेल्या लोकांना संसर्ग झाल्यानंतर एक, दोन दिवस नाहीतर तब्बल तीन महिन्यांपर्यंत मृत्यूचा धोका असतो.
3 महिन्यांनी चिकनगुनिया झाल्यानंतरही मृत्यूचा धोका
चिकनगुनिया हा एक विषाणूजन्य आजार आहे, जो डासांद्वारे मानवांमध्ये पसरतो. हा रोग साधारणपणे एडिस इजिप्ती आणि एडिस अल्बोपिक्टस डासांमुळे पसरतो, ज्यांना पिवळा ताप आणि टायगर डास म्हणून ओळखलं जातं. या आजारातील बहुतांश रुग्ण पूर्णपणे बरे होत असले, तरी काळजी न घेतल्यास चिकनगुनिया हा आजार जीवघेणा ठरू शकतो.
हार्ट आणि किडनीच्या आजारांचा धोका
संशोधनात असंही समोर आलं आहे की, चिकनगुनियाची लागण झालेल्या रुग्णाला संसर्ग झाल्यानंतर तीन महिने हार्ट आणि किडनीच्या आजारांचा धोका उद्भवतो. लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिनच्या संशोधकांनी त्यांच्या संशोधनासाठी सुमारे 1 लाख 50 हजार चिकनगुनिया संसर्गाचं विश्लेषण केलं आहे. शेवटी ते निष्कर्षापर्यंत पोहोचले की, संसर्गाचा कालावधी संपल्यानंतरही चिकनगुनियाच्या रुग्णांना मृत्यूचा धोका असतो.
चिकनगुनियाला साधा आजार समजत असाल, तर मोठी चूक करताय
संशोधकांच्या म्हणण्यानुसार, चिकनगुनियाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात नोंदविला जात नसला तरीही, 2023 मध्ये जगभरात सुमारे अर्धा दशलक्ष प्रकरणं आणि 400 हून अधिक मृत्यू या आजारामुळे झाल्याचं नोंदवलं गेलं आहे. चिकनगुनिया हा आजार किती गंभीर आहे आणि त्याला साधा आजार का समजू नये? हे या संशोधनातून समोर आलेल्या आकडेवारीतून दिसून येत आहे. तज्ज्ञांच्या मते, चिकनगुनिया विषाणूचा प्रसार करणाऱ्या डासांच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी उपाययोजनांवर काम करणं, हे या आजाराविरुद्धचं सर्वात मोठं शस्त्र आहे.
चिकनगुनियाची काही प्रमुख लक्षणं
- सांधे आणि हाडांमध्ये तीव्र वेदना
- वारंवार ताप येणं
- शरीरावर लाल पुरळ येणं
- डोकेदुखी आणि अशक्तपणा
- डोळ्यांमध्ये कंजंक्टिवाइटिस
चिकनगुनियापासून बचाव कसा कराल?
- घरात किंवा आसपासच्या परिसरात स्वच्छता राखा, जेणेकरुन डासांची पैदास होणार नाही
- घरात किंवा आसपासच्या परिसरात पाणी साठू देऊ नका, साठलेल्या पाण्यात डासांची पैदास होते
- अंगभर कपडे घाला, त्यामुळे डास चावणार नाहीत
- लक्षण दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा, दुखणं अंगावर काढणं टाळा
(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :
मासिक पाळीत का होते सतत गोड खाण्याची इच्छा? 'या' क्रेविंगवर नियंत्रण मिळवण्यासाठी काय कराल?