मुंबई : स्ट्रीट फूड (Street Food) म्हटलं की, प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं, त्यातच पाणीपुरी (Pani Puri) म्हटलं की बातच निराळी. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच पाणीपुरी आवडते. अनेक जण पाणी पुरी आवडीने खातात. मात्र, आता अलीकडेच या स्ट्रीट फूडबाबत एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. पाणीपुरीमध्ये कर्करोगास कारणीभूत ठरणारे घटक आढळल्याची चिंताजनक बातमी समोर आली आहे.


काय आहे संपूर्ण प्रकरण?


काही दिवसांपूर्वी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणने (FSSAI) कर्नाटकातील मोठ्या रेस्टॉरंटमधून तसेच रस्त्याच्या कडेला असलेल्या विक्रेत्यांकडून पाणीपुरीचे 260 नमुने गोळा केले होते. त्याचवेळी या नमुन्यांचा तपासणीनंतर अतिशय अतिशय धक्कादायक अहवाल समोर आला आहे.


पाणीपुरीमध्ये कर्करोगास कारणीभूत ठरणारे पदार्थ


डेक्कन हेराल्डच्या एका अहवालानुसार, कर्नाटकातील विविध ठिकाणहून गोळा केलेल्या 41 नमुन्यांमध्ये कृत्रिम रंग आढळून आहे. कृत्रिम रंगांच्या वापरामुळे त्यामध्ये कर्करोगास कारणीभूत ठरणाऱ्या पदार्थांचे प्रमाण वाढल्याचं या अहवालात आढळलं. याचा सोपा अर्थ असा की, या पाणीपुरीमुळे कर्करोग होण्याचा धोका वाढल्याचं समोर आलं आहे.


अन्नातून विषबाधासह अनेक गंभीर आजारांचा धोका


इतकंच नाही तर इतर 18 नमुने निकृष्ट दर्जाचे आणि आरोग्यासाठी पूर्णपणे असुरक्षित असल्याचं अहवालात समोर आलं आहे. याशिवाय इतरही अनेक नमुने शिळे होते. हे सेवन केल्यामुळे अन्नातून विषबाधासह अनेक गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो. अशाप्रकारे, एकूण 22 टक्के पाणीपुरीचे नमुने FSSAI च्या गुणवत्ता मानकांपेक्षा पूर्णपणे मागे होते. यामध्ये ब्रिलियंट ब्लू, सनसेट यलो आणि टारट्राझिन सारखी रसायने आढळली, ज्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात.


'अशी' पाणीपुरी खाणं टाळा


पाणीपुरीच्या पाण्यात कृत्रिम रंग आहे की नाही, हे ओळखण्यासाठी तुम्ही काही खास गोष्टींकडे लक्ष देऊ शकता. पाणीपुरीचे पाणी चिंच, कोथिंबीर आणि पुदिन्यापासून बनवलं जातं. चिंचेपासून तयार केलेल्या पाण्याचा रंग हलका तपकिरी असतो, तर कोथिंबीर आणि पुदिन्यापासून तयार केलेल्या पाण्याचा रंग गडद हिरवा दिसतो. तसेच, जर तुम्हाला चिंचेचं पाणी जास्त लाल किंवा तपकिरी दिसत असेल आणि तिखट पाणी जास्त हिरवं दिसत असेल, तर समजून जा की ते बनवण्यासाठी कृत्रिम रंगांचा वापर करण्यात आला असून अशी पाणीपुरी खाणं टाळा. 


याशिवाय कृत्रिम रंगांचा वापर केलेल्या पाण्याची चव थोडी कडू असू शकते आणि ते खाल्ल्यानंतर लगेचच घशात आणि पोटात जळजळ होऊ शकते. चांगल्या आरोग्यासाठी, तुम्ही घरी बनवलेल्या पाणीपुरीचे सेवन करू शकता.


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )


महत्त्वाच्या इतर बातम्या :