Brain Eating Amoeba : कोरोनानंतर आता दुर्मिळ आणि प्राणघातक ब्रेन इटिंग अमिबा (Brain Eating Amoeba) या संसर्गाने चिंता वाढवली आहे. एका 14 वर्षांच्या मुलाला दुर्मिळ प्राणघातक मेंदू संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. केरळमधील पायोली येथील एका मुलाला मेंदू खाणाऱ्या अमिबाची लागण झाली आहे. केरळमधील मे महिन्यापासूनची हे चौथं प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणांमध्ये सर्व मुलांचा समावेश आहे, त्यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
केरळमध्ये ब्रेन इटिंग अमिबाचा चौथा रुग्ण आढळला
मेंदू खाणाऱ्या अमिबाबाबतची भीती आरोग्यमंत्र्यांनी दूर केली आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी 5 जुलै रोजी एक बैठक घेतली, ज्यामध्ये पुढील संसर्ग टाळण्यासाठी अशुद्ध पाण्याच्या ठिकाणी आंघोळ करू नये, यासह अनेक सूचना देण्यात आल्या. या बैठकीत जलतरण तलावांचे योग्य क्लोरीनेशन व्हावे आणि लहान मुलांनी पाणवठ्यांमध्ये प्रवेश करताना काळजी घ्यावी, कारण त्यांना या आजाराची सर्वाधिक लागण होते, असेही निवेदनात म्हटलं आहे.
ब्रेन इटिंग अमिबा किंवा PAM म्हणजे काय?
पॅम (PAM) हा आजार नेग्लेरिया फाऊलेरीची (Naegleria Fowleri) नावाच्या अमिबा मुळे होतो, एक अमीबा यालाच मेंदू खाणारा अमिबा, असंही म्हणतात. या आजाराला Primary Amoebic Meningoencephalitis (PAM) असंही म्हटलं जातं. हा अमिबा उबदार गोड्या पाण्यात आढळतो. दूषित पाण्याद्वारे याचा संसर्ग होतो.
मेंदू खाणाऱ्या अमिबाचा संसर्ग कसा होतो?
तलाव, नद्या आणि दूषित पाणी किंवा कमीत कमी क्लोरीनयुक्त तलाव यांसारख्या उबदार गोड्या पाण्याच्या वातावरणात नेग्लेरिया फॉवलेरी अमिबा वाढतात. जेव्हा दूषित पाणी नाकात जाते, तेव्हा हा अमिबा शरीरात प्रवेश करतो आणि मेंदूमध्ये त्याचा संसर्ग होतो. या अमिबामुळे मेंदूंच्या ऊती नष्ट होऊन खूप नुकसान होते आणि मेंदूला सूज येते. हा अमिबा थेट मानवाच्या मेंदूवर हल्ला करतो आणि त्यामुळे मेंदूच्या पेशी हळूहळू नष्ट होतात.
मेंदू खाणाऱ्या अमिबाची लक्षणे काय?
PAM ची सुरुवातीची चिन्हे सामान्य आजारांसारखी आहेत. डोकेदुखी, ताप, मळमळ आणि उलट्या ही याची सुरुवातीची लक्षणं आहेत. यानंतर टप्प्यांमध्ये मान ताठ होणे, गोंधळल्यासारखे वाटणे, भ्रमिष्ट होणे ही लक्षणे दिसतात. यामध्ये शेवटच्या स्टेजमध्ये रुग्ण कोमामध्ये जाण्याची दाट शक्यता असते. हा रोग झपाट्याने वाढतो, अनेकदा लक्षणे दिसू लागल्यानंतर काही दिवसात रुग्णाचा मृत्यू होतो.
मुलांचे संसर्गापासून संरक्षण कसे करावे?
- उबदार गोड्या पाण्याची ठिकाणे किंवा थर्मल पूलपासून दूर रहा.
- मुलांनी थर्मल पूल आणि उबदार गोड्या पाण्यात डोके पाण्याच्या वर ठेवावं आणि नाक-तोंडात पाणी जाणार नाही, याची काळजी घ्यावी.
- तुमच्या मुलाला फक्त क्लोरीनयुक्त, स्वच्छ आणि सुस्थितीत असलेल्या जलतरण तलावांमध्ये पाठवा.
- पोहताना मुलांना नोज क्लीप लावा.
- नळी किंवा स्प्रिंकलरने खेळणाऱ्या मुलांचे निरीक्षण करा आणि त्यांना नाकात पाणी न टाकण्यास शिकवा.