Nutrition Tips :  आपल्या आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश केल्यामुळे अनेक फायदे मिळू शकतात. आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश आरोग्याच्या दृष्टीने चांगलं समजलं जातं. यामुळे पचनसंस्था सुदृढ राहण्यास मदत मिळते. बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळते. वजन कमी करायचं असेल आणि मधुमेहाच्या आजारापासून दूर राहायचं असेल, तर फायबरयुक्त आहाराचं (Fiber Rich Diet) सेवन केल्यामुळे जबरदस्त फायदा मिळू शकतो. संशोधनातून आढळून आले आहे की, फायबरयुक्त आहाराच्या सेवनामुळे शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित राहते आणि भूकही वेळेत लागते. याशिवाय डिमेन्शियाच्या आजाराची रिस्क कमी होते. या आजारात व्यक्तीला विसरभोळेपणा आजार जडलेला असतो. सुदृढ आरोग्यासाठी (Health) दररोज आपल्या आहारातून 25 ते 35 ग्रॅम फायबरचे सेवन केल्यामुळे अनेक फायदे मिळतात. परंतु, बहुतांश लोकांना दिवसभरात फक्त 15 ग्रॅम फायबर मिळतं. यामुळे तुमची फायबरची गरज पूर्ण करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींचा समावेश करायला हवा? याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया...


अवाकाडो (Avocado)


अवाकाडो फाळाच्या सेवनाने अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. या फळापासून आरोग्यदायी फॅट्स आणि फायबर भरपूर मिळतं. यामध्ये 6.7 ग्रॅम  इतकं फायबर आढळून येतं. अवाकाडो फळापासून विटामिन-सी, पोटॅशियम, मॅग्नेशियम, विटामिन-ई आणि विटामिन- बी भरपूर मिळतं. याच्या सेवनामुळे तुमचं हृदय आणि डोळ्याचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत मिळते. यामुळे ऑस्टियोपोरोसिस आजाराचा धोकाही कमी होतो. हा हाडांशी संबंधित आजार आहे. त्यामुळे निरोगी शरीरासाठी अवाकाडोचं सेवन करायला हवं.


सफरचंद आणि केळी (Apples And Bananas)


सफरचंद आणि  केळीमध्ये मुबलक प्रमाणात फायबर असतं. एका 100 ग्रॅम सफरचंदापासून 2.4 ग्रॅम फायबर मिळतं. तसेच, केळीमध्ये 2.6 ग्रॅम इतकं फायबर मिळतं. केळीमध्ये  विटामिन-सी, विटामिन-बी आणि पोटॅशियमसह इतर अनेक पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. केळी खाल्यामुळे शरीरातील फायबर आणि प्रोटीन कमतरता दूर होते. यामुळे दररोज सफरचंद आणि  केळीचं सेवन करा.


हरभरा (Gram)


हरभऱ्यामध्ये फायबर आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात आढळून येतं. दररोज 100 ग्रॅम हरभऱ्याचं सेवन केल्यामुळे शरीराला 7.6 ग्रॅम फायबर मिळतं. तुमच्या नियमित आहारात हरभऱ्याचा समावेश केल्यामुळे पचनसंस्था सुदृढ राहते आणि स्नायूंना चांगले प्रोटीन मिळतात. त्यामुळे निरोगी आरोग्य राखण्यासाठी हरभऱ्याचं योग्य प्रमाणात सेवन करा. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.)