Poha vs Rice : बहुतेक लोक सकाळच्या नाष्ट्यात आवडीनं पोहे खातात. याचं कारण पोहे पचायला हलके आणि खाताना चविष्ट असतात. तसेच यामध्ये अनेक पोषक घटक उपलब्ध असतात. यामुळे कोणत्याही व्यक्तीसाठी पोहे (Poha) खाणं चांगलं आहे. याउलट भात (Rice) आरोग्याच्या दृष्टीने चांगलं नसतं, असं म्हटलं जातं. याचं कारण भातात आर्सेनिकचं भरपूर प्रमाण असतं. कंज्युमर रिपोर्ट्समध्ये प्रसिध्द करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, आर्सेनिकचं प्रमाणाबाहेर सेवन केल्यामुळे त्वचा, मज्जासंस्था आणि फुफ्फुसांशी संबंधित आजार जडून आरोग्याची समस्या निर्माण होऊ शकते. 


साध्या पोहामध्ये चरबी आणि साखरेचं प्रमाण नसतं. पोह्यामध्ये पालेभाज्या टाकून तेलाची फोडणी दिल्यानंतरही त्याच्यातील पौष्टीक गुणात कोणताही बदल होत नाही. पण पोहे बनवत असताना चांगल्या गोडतेलाचा वापर करायला हवं. मॅक सिंह या आहार तज्ज्ञाने आपल्या फेसबुक पोस्ट सांगितले की, भात आणि पोहा यांची तुलना (Poha vs Rice) केली, तर पोहे आरोग्यासाठी चांगला आहे. याविषयी जाणून घेऊया...


1. पोह्यात असतं भरपूर फायबर


पोह्यापासून भरपूर फायबर मिळतं. 100 ग्रॅम पोह्यापासून 2 ते 4 ग्रॅम इतकं फायबर मिळतं आणि जवळपास 70 ग्रॅमपर्यंत आरोग्यदायी कार्बोहायड्रेट्स मिळतात. पोह्याला भातासारखं पॉलिश केलं जात नाही. पोहे खाल्यामुळे शरीरातील रक्ताची पातळी नियंत्रित राहण्यास मदत मिळते. 


2. पोह्यापासून मिळतं भरपूर लोह


पोह्यामध्ये लोह भरपूर प्रमाण उपलब्ध असतं. यामुळे जी लोकं अॅनिमियाशी संबंधित आजाराने ग्रस्त आहेत त्यांच्या आहारात पोह्याचा समावेश करावा. पोह्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यास मदत  मिळते. पोहे खाताना त्यामध्ये काही थेंब टाका आणि मिसळून घ्या. यामुळे पोह्यातील लोह पचवण्यासाठी सोपं जाईल.


3.वजन कमी करण्यासाठी फायदेशीर


पोहे हलके असल्यामुळे पचायला सोपं जातं. पोहे खाल्यामुळे शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. यामध्ये कॅलरिजचं प्रमाणही कमी असतं. त्यामुळे ज्यांना वजन कमी करायची इच्छा आहे त्यांनी पोहे खाल्लं तर फायदा मिळू शकतो.
      


4. जीवनसत्त्वं आणि खनिजे भरपूर मिळतात


पोहा बनवण्यासाठी लसूण, कांदा आणि टोमॅटो हिरव्या मिरच्या आणि पालेभाज्यांचा समावेश केला जातो. याचं कारणामुळे पोहे खाताना शरीराला अनेक पोषक घटक मिळतात. यामधील हिरव्या मिरच्या आणि लिंबामुळे शरीरातील जीवसत्त्वं-'सी'ची कमतरता दूर होण्यास मदत मिळते. 



(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.)