मुंबई : नंदुरबार येथील पाच वर्षांचा जयनील वसईकर गेल्या तीन महिन्यांपासून 'हृदय' प्रत्यारोपण शस्त्रक्रियेकरिता मुलुंड येथील फोर्टिस रुग्णलयात वाट पाहत आहे. वर्षभर कॅन्सरच्या आजाराविरोधात लढा दिल्यानंतर जयनीलचे हृदय काम करीत नसल्याचे निदान करण्यात आले होते. त्याच्या हृदयाच्या ठोक्यांची गती केवळ 5-10 टक्के आहे, जी गती सर्वसाधारण 60-65 टक्के इतकी असते. जयनीलच्या हृदयाच्या ठोक्यांची गती कृत्रिम पद्धतीने नियमित व्हावी म्हणून त्याला एकमो या मशीनवर ठेवण्यात आले आहे.


या मशीनमुळे त्याच्या हृदयाचं पंपिंग होत आहे. दोन दिवसापूर्वी त्याची तब्बेत खालावल्याने त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्याच्या फुफ्फुसात पाणी झाले आहे, त्यावरील उपचाराकरिता त्याला अतिदक्षता विभागात व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे. जयनीलला हृदयाची गरज आहे, याकरिता अवयदाना जनजागृती होणे गरजेचे असून राज्यात अवयवदानाच्या बाबतीत फार मोठ्या प्रमाणात उदासीनता दिसून येत आहे.


गेल्या वर्षी कोविडचा काळ असल्यामुळे अवयदान मोठ्या प्रमाणात होऊ शकले नाही, नवीन वर्ष चालू झाले असले तरी अद्याप त्यात फारसा बदल झालेला दिसत नाही. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात अवयदान होत असते. आता फेब्रुवारीच्या मध्यावर आतeपर्यंत चार अवयवदान झाले आहे. त्यामुळे या अवयवदान मोहिमेला मोठ्या प्रमाणात चालना मिळणे गरजेचे असून यावर शासकीयस्तरावर मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातून मत व्यक्त केले जात आहे.


जयनीलचे वडील मंगलेश हे नंदुबार येथे पोलीस दलात चालक म्हणून कार्यरत आहे. गेले 2 वर्ष ते आपल्या मुलाला वाचविण्यासाठी सर्व शर्तीचे प्रयत्न करत आहे. गेले तीन महिने ते आपल्या मुला सोबत मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात राहत आहे. 2019 मध्ये वर्षभर कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराचा लढा देऊन बरा होत नाही, तोच त्याला आणखी एका मोठ्या आजाराने गाठलं. त्या आजारात त्याची हृदयाच्या ठोक्यांची गती इतकी मंदावली की त्या आजारातून त्याला बाहेर येण्यासाठी हृदयप्रत्यारोपण (Heart Transplantation ) हा एकमेव पर्याय असल्याचे त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सुचविले आहे.

जयनीलचे वडील मंगलेश वसईकर आपल्या या वेदनादायी प्रवासाबद्दल माहिती देताना सांगतात की, "गेली दोन वर्ष मी माझा मुलगा बरा व्हावा त्यासाठी संघर्ष करत आहे आणि त्याला चांगले करण्यासाठी अजूनही प्रयत्न करत राहिल. तो काही दिवसांपासुन सर्वसाधारण खोलीत उपचार घेत होता. मात्र, मागील दोन दिवसांपासून त्याला श्वसनाचा अधिक त्रास झाल्याने त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की अवयवदानाबद्दल जनजागृती करा. त्यातूनच माझा मुलाचे प्राण वाचू शकतात."


फेब्रुवारी 5ला, 'पोलिसाच्या मुलाला पैसे नको, हृदय हवंय!' या शीर्षकाखाली या बाबत सविस्तर वृत्त एबीपी माझा डिजीटलवर देण्यात आले होते.


याप्रकरणी फोर्टिस रुग्णालयातील इंटेन्सव्हिस्ट आणि ऍनेस्थेसिस्ट, जे हृदय प्रत्यारोपण करण्याच्या टीममध्ये आहे, ते डॉ.शिवाजी माळी यांनी एबीपी माझा डिजीटलशी बोलताना सांगितले की, "जयनीलच्या हृदयाच्या ठोक्यांची गती मोठ्या प्रमाणात मंदावली आहे, त्यामुळे त्याला एकमो नावाच्या मशीनवर ठेवण्यात आले. त्याच्या हृदयाची धडधड कृत्रिमरीत्या या मशीनद्वारे सध्या सांभाळली जात आहे. मात्र, मोठा काळ या मशीनवर ठेवणे योग्य नाही, या काळात त्याची प्रकृती खालावू शकते. दोन दिवसापुर्वी त्याची तब्बेत थोडी खालावली म्हणजे त्याला श्वसनास त्रास घ्यायला त्रास होऊ लागला. कारण, त्याच्या फुफ्फुसात पाणी झाले आहे. त्यामुळे त्याला व्हेंटीलेटरवर अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. सध्या त्याची तब्बेत ठीक आहे. त्याला लवकरात लवकर मेंदूमृत दात्याकडून हृदय मिळाले पाहिजे. त्याचा रक्तगट ओ पॉजिटीव्ह आहे. तसेच त्याचे वजन 20 किलोग्रॅम इतके आहे. त्यामुळे मिळणारे दात्याचे हृदय हे ओ पॉजिटीव्ह रक्तगटाचे आवश्यक असून त्याचे वजन जास्तीत जास्त 40-50 किलो असणे अपेक्षित आहे. कारण लहान मुलांचे अवयवदान फार मोठ्या प्रमाणात होत नाही. त्यामुळे इतका फरक असणारा दाता मिळणे गरजेचे आहे. ही शस्त्रक्रिया आमचे येथील वरिष्ठ डॉक्टर धनंजय मालनकर हे करणार असून त्यांना या क्षेत्रातील अनुभव आहे."

आपल्या देशात आणि राज्यात मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा, 1994 अंतर्गत अवयव प्रत्यारोपण केले जाते. कालांतराने या कायद्यात अधिक बदल करून 2014 साली काही सुधारणा करण्यात आल्या. आपल्याकडे राज्यात अवयवाच्या नियमनाकरिता चार मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर अशा विभागीय प्रत्यारोपण समन्वय समिती कार्यरत आहेत. या समिती मार्फत ज्या रुग्णांना अवयव पाहिजे आहे, त्यांचे नोंदणीकरण केले जाते. ही समिती मेंदूमृत व्यक्तीचे अवयव आणि गरजू रुग्णांमध्ये समन्वयाचे काम पाहत असते. गेल्या काही वर्षात या समित्या उत्तमरीत्या आपले काम करीत आहेत. या व्यतिरिक्त आपल्या राज्यात काही वर्षांपूर्वीच अवयव दानासंदर्भात राज्यस्तरावर समन्वय साधणारी राज्य अवयव आणि ऊती प्रत्यारोपण संस्थेची केंद्र विभागातर्फे स्थापना करण्यात आली आहे.


राज्य अवयव आणि ऊती प्रत्यारोपण संस्थेच्या माहितीनुसार, सध्या राज्यात अवयवांची गरज असणारी रुग्णाची मोठी प्रतीक्षायादी आहे. साधारणतः मूत्रपिंडासाठी 5487, यकृतासाठी 1095, हृदयासाठी 89 आणि फुफ्फुसासाठी 19 रुग्ण प्रतीक्षेत आहेत. यापैकी किडनीसाठी प्रतीक्षेत असणारे रुग्ण डायलेसीसवर आणखी काही महिने जगू शकतात. मात्र, हृदय, यकृत आणि फुफ्फुस यासारखे अवयव असणाऱ्या रुग्णाची परिस्थिती ही बिकट असते. कारण त्यांना अवयव प्रत्यारोपण करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो.