Health Tips : आजच्या काळात मधुमेह (Diabetes) हा इतका सामान्य आजार झाला आहे की, ज्येष्ठांबरोबरच तरूणांतही या आजाराचं प्रमाण वाढत चाललं आहे. मधुमेह वाढण्याचं प्रामुख्याने कारण म्हणजे आपल्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि बिघडलेली जीवनशैली. या कारणामुळे अनेक लोक या आजाराला बळी पडत चालले आहेत. हा एक मेटाबॉलिक डिसऑर्डर असल्याचे आरोग्य तज्ज्ञ सांगतात. हा आजार मुळापासून नष्ट करता येत नाही पण योग्य औषधं आणि योग्य जीवनशैलीने यावर नियंत्रण मिळवता येते.
आकडेवारीनुसार, भारतात सुमारे 10 कोटी लोक मधुमेहाचे रुग्ण आहेत. एवढेच नाही तर, भारतात असे अनेक लोक आहेत जे प्री-डायबेटिक आहेत. याचाच अर्थ, कोणतीही व्यक्ती या आजाराला अगदी सहज बळी पडू शकते. पण, मधुमेहाचं प्रमाण झपाट्याने वाढण्यामागची कारणं नेमकी कोणती आहेत याबद्दल तुम्हाला काही माहीत आहे का? नसेल तर याच संदर्भात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
मूत्रपिंड आणि अंधत्वाचे कारण
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, मधुमेह ही अशी दिर्घकालीन स्थिती आहे ज्यामध्ये हृदयविकाराचा झटका, पक्षाघात, अंधत्व आणि मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका असतो. 2019 मध्ये जगभरात मधुमेहामुळे सुमारे 20 लाख मृत्यू झाले. पण, भारतात मधुमेह वाढण्यामागचं कारण नेमकं काय ते जाणून घेऊयात.
व्यायाम न करणे
आपल्यामध्ये असे अनेक लोक आहेत जे व्यायाम करण्याचा कंटाळा करतात. शारीरिक हालचाल न करण्याच्या सवयीमुळेसुद्धा अनेक लोकांमध्ये मधुमेहाचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशा वेळी दिवसातून किमान अर्धा तास व्यायामासाठी काढणं गरजेचं आहे.
ताण
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात तणाव इतका वाढत चालला आहे की, हेच अनेक आजारांचं कारण ठरतंय. तुम्हाला माहीत नसेल, पण जास्त ताण घेतल्यानेही मधुमेह होऊ शकतो. तणावामुळे माणसाला फक्त मानसिक त्रास होत नाही तर त्याचे परिणाम शारीरिकदृष्ट्याही दिसून येतात. तणावामुळे स्वादुपिंड सारख्या अवयवांवरही परिणाम होतो. हे शरीरातील इंसुलिन आणि ग्लुकोजच्या पातळीचे व्यवस्थापन करण्यास मदत करतात.
साखर खाणे
आपल्या सर्वांनाच माहीत आहे की गोड पदार्थांच्या अति सेवनाने मधुमेहाचा त्रास होतो. तसेच, कुकीज, केक आणि चॉकलेट्स वारंवार खाल्ल्याने रक्तातील साखर वाढते. याशिवाय मिठाईयुक्त पदार्थ खाल्ल्यानेही रक्तातील साखर वाढते. यासाठी गोड पदार्थांचं मर्यादित सेवन करावं.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :