Health Tips : थंडीचे दिवस (Winter Season) सुरु असल्यामुळे अनेकदा आपल्या आजूबाजूला ताप, सर्दी, खोकला (Cough) यांसारख्या संसर्गाचे रूग्ण दिसतात. अशातच तुम्हाला किंवा तुमच्या आजूबाजूला कोणाला जर अनेक दिवसांपासून गंभीर खोकल्याचा त्रास होत असेल तर याला हलक्यात घेऊ नका. जो खोकला 100 दिवसांपेक्षाही जास्त आहे अशा खोकल्याला 'पेर्तुसिस' किंवा डांग्या खोकला म्हणतात. बदलत्या हवामानामुळे काही ठिकाणी या आजाराच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. पण, वारंवार खोकला येणं हे खरंच दिर्घकालीन आजाराचं लक्षण आहे का? खोकला झाल्यास तो कसा टाळू शकाल? डांग्या खोकल्याची लक्षणं नेमकी कोणती? याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 


100 दिवसांहूनही जास्त खोकला राहतो का?


संसर्गामध्ये काही खोकला असा असतो जो लवकर बरा होतो. तर, काही खोकला बरा होण्यासाठी बराच कालावधी लागतो. यामध्ये 100 दिवसांहूनही जास्त दिवस येणाऱ्या खोकल्याला 'पेर्टुसिस' असेही म्हणतात. हा एक गंभीर खोकला आहे ज्यामुळे श्वसनमार्गामध्ये संसर्ग होतो. या खोकल्याची लागण झाल्यास लस घेणं गरजेचं आहे. विशेषत: एखाद्या लहान मुलाला हा खोकला होऊ लागला तर वेळीच त्याला डॉक्टरांकडे नेणं गरजेचं आहे. जर एखाद्या रुग्णाला याचा त्रास झाला तर तो खोकला, शिंकणे किंवा बोलण्याद्वारे देखील पसरतो. पेर्ट्युसिसचा त्रास कोणालाही होऊ शकतो. विशेषतः ज्या मुलांची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे अशा मुलांसाठी हा आजार धोकादायक असू शकतो.  


डांग्या खोकल्याची लक्षणे :


सुरुवातीची लक्षणे (1-2 आठवडे)


पहिल्या एक ते दोन आठवड्यात या आजारात नाक वाहतं तसेच नाक चोंदलं असतं. हलका ताप, हलका खोकला ही सामान्य लक्षणे आढळून येतात. त्यामुळे हा रोग बराच काळ त्रास देऊ लागतो. 


नंतरची लक्षणे (2-10 आठवडे)


वारंवार खोकला येणे, अनेकदा रात्रीच्या वेळी जास्त खोकला येणे यांसारख्या समस्या वाढताना दिसतात. यामध्ये उलट्या, थकवा आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.


डांग्या खोकल्याची कारणे


पेर्टुसिसमागील गुन्हेगार बोर्डेटेला पेर्टुसिस हा जीवाणू आहे. जेव्हा संक्रमित व्यक्ती खोकते, शिंकते किंवा बोलते तेव्हा ते हवेतून सहज पसरतात. डांग्या खोकला होण्याचा धोका एखाद्या संक्रमित व्यक्तीच्या जवळच्या संपर्कामुळे लक्षणीय वाढतो.


यावर उपचार काय?


डांग्या खोकल्याची तीव्रता कमी करण्यासाठी आणि संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी पेर्ट्युसिसचा लवकर शोध घेणे आणि वेळीच योग्य उपचार घेणं गरजेचं आहे. 


प्रतिबंधात्मक उपाय 


लसीकरण पेर्ट्युसिस रोखण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. DTaP (डिप्थीरिया, टिटॅनस आणि ऍसेल्युलर पेर्ट्युसिस) लस नियमितपणे लहान मुलांना दिली जाते. जे डांग्या खोकल्यापासून संरक्षण देते. याशिवाय रोगप्रतिकारक शक्ती टिकवण्यासाठी Tdap नावाची बूस्टर लस तरुण आणि प्रौढांना दिली जाते. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Cervical Cancer Symptoms : महिलांमध्ये आढळणारा सर्वायकल कॅन्सर नेमका कशामुळे होतो? वाचा लक्षणं आणि उपचार