Health Tips : लहान मुलं असोत किंवा वृद्ध व्यक्ती, मानवी शरीरात लोहाची (Iron) कमतरता ही अगदी सहजपणे आढळून येणारी समस्या आहे. या लोहाच्या कमतरतेवर जर तुम्ही वेळीच उपचार केले नाही तर आपल्याला अनेकदा थकवा जाणवतो अॅनिमियासारख्या विविध समस्या जाणवू लागतात. लोहाच्या कमतरतेमुळे व्यक्तीच्या शरीरावर हळूहळू पण अतिशय हानिकारक परिणाम होऊ लागतात, म्हणूनच याला 'सायलेंट किलर' असं म्हटलं जातं. शरीरात लोह कमी असेल तर होणाऱ्या अॅनिमियाची सर्वसामान्य लक्षणे कोणती या संदर्भात पोषण सल्लागार कविता देवगन यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. या संदर्भात अधिक जाणून घेऊयात. 


'यासाठी' शरीरात लोह असणं गरजेचं आहे  


लोह हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे जो आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये आढळतो. प्रत्येक व्यक्तीच्या, खासकरून महिला आणि मुलांच्या आहारात पुरेशा प्रमाणात लोह असलेच पाहिजे. लोह हा हिमोग्लोबीनचा एक भाग आहे, आपल्या संपूर्ण शरीरापर्यंत प्राणवायू पोहोचवण्याचे काम हिमोग्लोबिन करतं. आपल्या शरीरातील जवळपास 70 टक्के लोह लाल रक्तपेशींमध्ये आढळते.


शरीरामध्ये लोह कमी असेल तर अॅनिमिया होतो. एकंदरीत आरोग्य चांगलं राहावं यासाठी आहारामध्ये पुरेशा प्रमाणात लोह असलेच पाहिजे. वाढत्या वयातील मुलांसाठी लोह हा एक महत्त्वाचा पोषण घटक आहे. लाल रक्तपेशींच्या निर्मितीमध्ये व्हिटॅमिन बी12 महत्त्वाची भूमिका बजावते.


शरीरात लोह कमी असेल तर सर्वसामान्य लक्षणे कोणती?


• कारण नसताना थकवा येणे, अशक्तपणा जाणवणे.   
• चक्कर येणे.
• कोणतीही थंड गोष्ट, थंड तापमान सहन न होणे. 
• अगदी थोडेसे शारीरिक काम केले तरी धाप लागणे. (उदा. काही पायऱ्या चढल्यानंतर)


लोहाचे प्रमाण वाढण्यासाठी उपाय कोणते?


शरीरात लोहाचे प्रमाण वाढावे यासाठी तुमच्या नेहमीच्या आहारात चरबी कमी असलेले मांस, फोर्टिफाईड सिरीयल आणि सोया नट्स यांसारख्या लोहयुक्त अन्नपदार्थांचा समावेश करा. डाळिंब, कलिंगड या ताज्या फळांमध्ये लोह आढळतं तर, ड्रायफ्रूट्समध्ये मनुका, ऍप्रिकॉट्स, खजूर आणि पीच यांसारख्या फळांमध्ये देखील लोह भरपूर प्रमाणात आढळतं. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या : 


Health Tips : गुलाबी थंडीत 'या' चहाने तुमच्या दिवसाची सुरुवात करा; प्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच व्हायरलपासूनही संरक्षण मिळेल