Hasan Mushrif on Samarjeetsinh Ghatge : छापेमारीनंतर तपास सुरु असताना बदनामी कशासाठी करता? माझं व्हायचं ते होईल, हसन मुश्रीफ बँकेचा चेअरमन म्हणून त्यांना खूपत असावं, अशा शब्दात जोरदार पलटवार आमदार हसन मुश्रीफ  (Hasan Mushrif) यांनी केला आहे. भाजप जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे (Samarjeetsinh Ghatge) यांनी केलेल्या आरोपानंतर मुश्रीफ यांनीही लगेच पत्रकार परिषद घेत घाटगेंच्या आरोपांचा समाचार घेतला. शाहू कारखाना 46 वर्षांचा असताना आपण 225 कोटींचे कर्ज का काढले? अशी विचारणाही त्यांनी केली. आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून असा प्रकार सुरु असल्याचा टोला त्यांनी लगावला. संताजी घोरपडे कारखान्याला 323 कोटींचे कर्ज असून त्याला सर्व तारण दिल्याचे ते म्हणाले.


बँक शेतकऱ्यांचीच आहे, पण बँकेला बदनाम करू नका, हे सगळे कटकारस्थान समोरून ज्याची लढण्याची हिंमत नाही हे लोक करत आहेत. आज चित्र स्पष्ट झालं आहे, माझ्या कुटुंबाला त्रास देणारे कोण हे समोर आल्याचेही ते म्हणाले. 


मी कोणतीही शिक्षा भोगण्यास तयार


हसन मुश्रीफ पुढे म्हणाले, तपास सुरु असताना बदनामी कशासाठी करता? माझं व्हायचं ते होईल. कटकारस्थान केली जात आहेत. नाबार्ड आणि रिझर्व्ह बँकेने परवानगी दिल्यानंतर आत्मनिर्भर योजनेत कर्ज दीर्घकालीन करण्यात आली होती, असे त्यांनी सांगितले. हसन मुश्रीफ म्हणाले की, शाहू दूध संघाची सध्या काय अवस्था आहे? संघाची अवस्था पाहून विक्रमसिंह घाटगे यांनी सर्वात मोठी चूक केल्याचे म्हणाले होते. तोच दूध संघ विकल्यानंतरही केंद्राच्या योजनेतून 15 कोटींचे अनुदान घेतले. कागल बँकेत नंगानाच सुरु आहे. यांचीच ही सर्व कटकारस्थाने आहेत. केडीसीसी बँकेत चुकीचं काहीही झालेलं नाही. त्यांनी पुढे सांगितले की, आम्ही बेकायदेशीर केलं नाही, शिफारस केल्याशिवाय कर्ज देत नाही. हसन मुश्रीफ चेअरमन असल्याने खूपत असावं. आम्ही बँकेच्या कारभारात कोणताही गटतट मानत नाही. ते शेतकऱ्यांच्या ठेवीवर कर्ज काढल्याचे म्हणतात, मात्र एक शेतकरी घेऊन यावे, त्यांनी मी फसवणूक केल्याचे सांगावे मी कोणतीही शिक्षा भोगण्यास तयार आहे. 


हसन मुश्रीफ खोटं का बोलले?


दरम्यान, सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना हा शेतकऱ्यांच्या मालकीचा नसून हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबीयांच्या मालकीचा असल्याचा आरोप भाजप जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे (Samarjeetsinh Ghatge) यांनी केला आहे. कारखान्याचे नाव बदलून हसन मुश्रीफ प्रायव्हेट लिमिटेड करावा, असा टोला त्यांनी लगावला आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून संताजी घोरपडे कारखान्याला 233 कोटींचे कर्ज देऊनही हसन मुश्रीफ खोटं का बोलले? असा हल्लाबोल त्यांनी केला आहे. सात वर्षांपासून चेअरमन असलेला एवढा खोटा बोलतो, त्यावेळी बँकेची बदनामी होत नाही का? अशी विचारणा त्यांनी केली. 2018 /19 मध्ये नाबार्डकडून 158 कोटी कर्ज दिलं गेलं. 2019 मध्ये नाबार्डकडून 295 कोटींपर्यंत कर्ज वाढवलं गेल्याचा दावा त्यांनी केला. 


इतर महत्वाच्या बातम्या