Health Tips For Women : अनेकदा स्त्रिया (Women) आपल्या प्रायव्हेट पार्टच्या समस्यांकडे दुर्लक्ष करतात किंवा लाजेमुळे कोणाला काही सांगू शकत नाहीत. पण, तुम्हाला माहिती आहे का, योनीमार्ग निरोगी ठेवणं फार महत्त्वाचं आहे. यासाठी तुम्ही स्त्रीरोगतज्ञाचा सल्ला घेऊ शकता. स्त्रीरोगतज्ज्ञांना भेटताना महिलांना अनेकदा तणाव जाणवत असला तरी, केवळ स्त्रीरोगतज्ज्ञ (Gynecologist) कोणत्याही महिलेला तिच्या प्रजनन आरोग्याबाबत उपचार देऊ शकतात. एका महिलेने केव्हा स्त्रीरोगतज्ज्ञांना भेटणं गरजेचं आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
अनियमित मासिक पाळी येणे
काही स्त्रियांना पाळी येण्यास उशीर होणे, जास्त रक्तस्त्राव होणे किंवा दीर्घकाळापर्यंत रक्तस्त्राव होणे यांसारख्या समस्या उद्भवतात. या समस्या हार्मोनल असंतुलन, पीसीओएस (PCOS), थायरॉईड इत्यादींमुळे देखील असू शकतात. अनेक वेळा महिला या समस्यांकडे दुर्लक्ष करतात. अशा परिस्थितीत, स्त्रीरोगतज्ञाचा सल्ला नक्कीच घ्या.
ओटीपोटात वेदना होणे
जर तुम्हाला बऱ्याच काळापासून ओटीपोटात वेदना होत असतील तर अशा वेळी स्त्रीरोगतज्ञाशी संपर्क साधा. मासिक पाळी किंवा संभोग दरम्यान महिलांना ओटीपोटाचा त्रास सहन करावा लागतो. काही महिलांना सेक्स दरम्यान सतत ओटीपोटात वेदना होतात, हे एंडोमेट्रिओसिस, पेल्विक इन्फ्लॅमेटरी डिसीज (पीआयडी), फायब्रॉईड्स किंवा ओव्हेरियन सिस्ट यांसारख्या समस्यांचे लक्षण असू शकते, त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
योनीतून स्त्राव होणे
योनीतून स्त्राव होणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण, जेव्हा त्याचा रंग किंवा वास वेगळा असतो तेव्हा ही चिंतेची बाब असू शकते. योनीतून स्त्राव झाल्यामुळेही अनेक संसर्ग होऊ शकतात. ही समस्या वाढू नये म्हणून वेळीच स्त्रीरोगतज्ञाचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
यूटीआय संसर्ग
जर तुम्हाला लघवी करताना वेदना आणि जळजळ होण्याची समस्या असेल तर नक्कीच स्त्रीरोगतज्ञाला भेट द्या. याशिवाय लघवीला रक्त किंवा तीव्र वास येत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे महिलांना जर यासमस्या असतील तर त्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या बातम्या :