New year 2024 :  2023 हे वर्ष संपण्यााठी काही दिवसच शिल्लक आहेत. या नवीन वर्षात काही बदल होणार आहेत. 1 जानेवारी 2024 पासून आर्थिक क्षेत्रातही काही महत्वाचे बदल होणार आहेत. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला अशाच काही महत्त्वाच्या बदलांच्या संदर्भात माहिती देणार आहोत. तुम्हाला 31 डिसेंबरपूर्वी काही कामं पूर्ण करावी लागणार आहेत. अन्यथा तुमचं नुकसान होऊ शकतं. 


यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उशीरा आयकर रिटर्न भरणे. याशिवाय, डिमॅट आणि म्युच्युअल फंड खात्यात नॉमिनी जोडणे, बंद केलेला UPI आयडी पुन्हा सुरू करणे आणि बँक लॉकरच्या नवीन करारावर स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. कारण या कामांची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. अशा परिस्थितीत 31 डिसेंबरपूर्वी ही कामे पूर्ण करून नुकसान टाळता येईल.


दंडासह आयकर न भरल्यास कारवाई होणार


सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आयकर रिटर्न भरणे कारण, आर्थिक वर्ष 2022-23 साठी दंडासह विलंबित आयकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2023 आहे. आयकर कायद्याच्या कलम 234 एफ अंतर्गत, देय तारखेपूर्वी रिटर्न न भरणाऱ्या व्यक्तीवर कारवाई केली जाईल. उशीरा आयटीआर भरणाऱ्यांना 5,000 रुपये दंड आकारला जाईल. मात्र, ज्यांचे एकूण उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना फक्त 1000 रुपये दंड भरावा लागेल. मात्र 31 डिसेंबरनंतर त्यांना 5 हजार रुपयांचा दंडही भरावा लागणार आहे.


बँक लॉकर करारावर स्वाक्षरी 


दुसरे सर्वात महत्वाचे काम म्हणजे बँक लॉकर करारावर स्वाक्षरी करणे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार, सुधारित बँक लॉकर करारावर स्वाक्षरी करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत, जर बँक ग्राहक बँक लॉकर करारावर सही करू शकला नाही तर त्याचे लॉकर गोठवले जाईल. RBI ने बँक लॉकर करारासाठी नूतनीकरण प्रक्रिया अंतिम तारखेसह अनिवार्य केली आहे. 31 डिसेंबर 2022 रोजी किंवा त्यापूर्वी बँक लॉकर करार सादर केलेल्या खातेधारकांना सुधारित करारावर स्वाक्षरी करावी लागेल आणि ते त्यांच्या संबंधित बँक शाखेत जमा करावे लागतील.


नवीन सिम कार्ड खरेदी करण्याचे नियम बदलणार 


1 जानेवारी 2024 पासून नवीन सिम कार्ड खरेदीचे नियमही बदलतील. दूरसंचार विभागाच्या म्हणण्यानुसार, ग्राहकांना आता पेपर आधारित प्रक्रियेद्वारे केवायसी सबमिट करावे लागेल. फक्त टेलिकॉम कंपन्या ई-केवायसी करतील. मात्र, नवीन मोबाईल कनेक्शन घेण्याचे उर्वरित नियम कायम राहणार आहेत. त्यात कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही. 31 डिसेंबरपर्यंत कागदपत्रांद्वारेच सिमकार्ड मिळतील.


डिमॅट खात्यांमध्ये नॉमिनीचे नाव जोडणे अनिवार्य


SEBI ने 1 जानेवारी 2024 पर्यंत सर्व डिमॅट खातेधारकांना नामांकन दाखल करणे बंधनकारक केले आहे. खातेदार अयशस्वी झाल्यास, ते शेअर्समध्ये व्यवहार करू शकणार नाहीत. असे करण्याची अंतिम मुदत आधी 30 सप्टेंबर होती, ती तीन महिन्यांनी वाढवण्यात आली होती. म्हणजे 31 डिसेंबरपर्यंत हे काम तुम्हाला पुर्ण करावं लागणार आहे. 


UPI आयडी सक्रिय करण्याची शेवटची संधी


नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनने पेमेंट अॅप्स (गुगल पे, पेटीएम, फोन पे) इत्यादींना ते UPI आयडी बंद करण्यास सांगितले आहे. जे एका वर्षापासून सक्रिय नाहीत. UPI द्वारे पेमेंट करणार्‍या ग्राहकांना त्यांचा आयडी सक्रिय करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


बँका विनाकारण तुमच्या खात्यातून पैसे कट करतात का? असं होत असेल तर काय कराल? RBI चा नियम काय?