Health Tips : आपल्यापैकी प्रत्येकाच्या जिभेचे चोचले फार वेगळे असतात. काहींना तिखट खायला आवडतं, तर काहींना गोडाचे पदार्थ खायला आवडतात. आता गोडाचे पदार्थ म्हटल्यानंतर सर्वात आधी डोळ्यांसमोर येते ती मिठाई. काहींना तर जेवणानंतर मिठाई लागतेच. पण, भविष्यात यामुळे आपल्या शरीराला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो हे तुम्हाला माहीत आहे का? तसेच, साखरेचे (Sugar) पदार्थ खाल्ल्याने फक्त मधुमेहाचाच (Diabetes) त्रास होत नाही तर लहान मुलांना अकाली वृद्धत्व देखील येऊ शकते.


अशा परिस्थितीत जर तुम्ही गोड खाण्याचे शौकीन असाल आणि जास्त साखर वापरत असाल तर ही सवय ताबडतोब बदला, नाहीतर तुम्हाला अकाली वृद्धत्व येऊ शकते. साखरेचा तुमच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.


साखर खाण्याचे तोटे


पिंपल्सची समस्या


जास्त साखर खाल्ल्याने त्वचेवर पिंपल्स वाढतात. कारण शरीरातील साखरेची पातळी वाढली की जळजळ वाढते. त्यामुळे त्वचेवर पिंपल्स, ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स सारख्या समस्या उद्भवू शकतात. यामुळे तुम्ही वृद्ध दिसू लागाल.


सुरकुत्या त्वचेचे सौंदर्य खराब करतात


शुद्ध साखर शरीरात ग्लायकेशन वाढवण्याचे काम करते. अशा परिस्थितीत, साखरेचे रेणू त्वचेतील कोलेजन आणि इलास्टिन तंतूंशी जोडले जातात, ज्यामुळे त्वचेचे इलास्टिन कमी होऊ लागते. आणि त्वचेवर सुरकुत्या पडू लागतात. यामुळे त्वचेच्या वृद्धत्वावर परिणाम होतो आणि वेळेपूर्वी तुम्ही वृद्ध दिसू शकता.


तेलकट त्वचेची समस्या


नैसर्गिक तेल आपल्या सर्व शरीरात आढळते. त्याचे काम त्वचेला मॉइश्चरायझ करणे आहे. जेव्हा आपण खूप गोड खातो तेव्हा शरीरात सीबमचे उत्पादन वेगाने वाढते आणि त्वचेतून अधिक तेल बाहेर पडू लागते. यामुळे मुरुम यासारख्या समस्या उद्भवतात ज्यामुळे लवकर वृद्धत्व होते.


जळजळ वाढते


जास्त साखर खाल्ल्याने शरीरात जळजळ होण्याची प्रतिक्रिया निर्माण होते. त्यामुळे त्वचेला सूज येऊ लागते. यामुळे, आपल्या त्वचेमध्ये सोरायसिस आणि एक्जिमा सारख्या रोगांचा धोका लक्षणीय वाढतो. त्वचेवर जळजळ झाल्यामुळे त्वचेशी संबंधित इतरही अनेक समस्या उद्भवू शकतात. ज्यामुळे तुम्ही म्हातारे दिसू लागता. 


(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Coconut Water : उच्च रक्तदाबाच्या रूग्णांनी नारळ पाण्याचं सेवन करावं की करू नये? वाचा तज्ज्ञांचा सल्ला