Health Tips : भारतीय जेवणात डाळींचा वापर प्रामुख्याने केला जातो. कारण डाळींमध्ये अनेक पोषक घटक असतात. डाळ (Dal) हा आहारातील अत्यंत आवश्यक घटक असूनदेखील डाळींच्या बाबतीत अजूनही काही लोकांना डाळींचे महत्त्व माहीतच नाही. आपल्या आरोग्यासाठी डाळी कशाप्रकारे उपयुक्त ठरतात हे अनेक लोकांना ठाऊक नसते. डाळींमध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते, डाळींचे सेवन केल्यावर पोट तृप्त झाल्याची भावना निर्माण होते आणि नंतर बराच काळ भूक लागत नाही. या संदर्भात टाटा संपन्नच्या पोषण सल्लागार, कविता देवगण यांनी काही महत्त्वाची माहिती दिली आहे. जाणून घेऊयात डाळींमधून पोषण मिळविण्याचे पाच सोपे उपाय.
डाळींमधून जास्तीत जास्त पोषण मिळविण्याचे 5 सोपे मार्ग :
1. अनपॉलिश्ड डाळी : डाळींमध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. विशेष म्हणजे, शाकाहारी व्यक्तींसाठी डाळ हा प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे. पण डाळ खरेदी करताना नेहमी अनपॉलिश्ड डाळी निवडा कारण तेच कोणत्याही डाळीचे नैसर्गिक स्वरूप आहे. डाळ अनपॉलिश्ड असल्याने त्यातील सर्व पोषक तत्त्वे कायम राखली जाण्यात मदत होते. पाणी, तेल किंवा चामडे यांचा वापर कृत्रिम पॉलिशिंग केलेल्या डाळी वापरणे टाळा. यामुळे आरोग्याचे नुकसान होते.
2. चांगल्या दर्जाची डाळ निवडा : एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की, कोणतीही डाळ खरेदी करताना चांगल्या ब्रॅंडची, दर्जाची डाळ खरेदी करा. चांगल्या दर्जाच्या डाळींमध्ये अनेक प्रथिने असतात. त्यामध्ये फॅट्स नसतात. तसेच, कॅलरीजचे प्रमाणही मर्यादित असते. डाळींत भरपूर पोषण असते.
3. वैविध्य : आपल्या देशामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी आणि कडधान्ये सहज मिळतात. प्रत्येक डाळीचे स्वतःचे आरोग्याविषयी अनेक लाभ आणि पोषण गुण आहेत. तुमच्या शरीराला सर्वांगीण पोषण सतत मिळत राहावे यासाठी रोज वेगवेगळ्या प्रकारच्या डाळींचा वापर करा.
4. वेगवेगळ्या प्रकारे वापर करा : डाळींचे सेवन करणे अनेकांना कंटाळवाणे वाटू शकते. यासाठी डाळीत नेहमी वेगवेगळ्या वस्तूंचा समावेश करा. डाळी आणि कडधान्यांचा वापर विविध प्रकारे करता येतो. न्याहारीच्या पदार्थांपासून सूप, सार आणि आमटीपर्यंत, खिचडी, पुलाव, बिर्याणीपासून ते कोशिंबिरींपर्यंत सगळ्यामध्ये डाळी वापरता येतात. डाळींपासून तुम्ही वेगवेगळ्या रेसिपी तयार करू शकता. डाळीचे सूप हा आहारामध्ये डाळीचा जास्तीत जास्त वापर करण्याचा एक उत्तम मार्ग आहे.
5. दिवसातून एकदा : डाळ हा तुमचा प्रमुख आहार असायला हवा. प्रत्येक दिवशी किमान एकदा एका डाळीचे सेवन करायलाच हवे. आपल्या इतर अनेक पारंपरिक आरोग्यदायी सवयींप्रमाणे जेवणात डाळ असली पाहिजे ही सवय अनेक लोकांनी मागे सोडली आहे. पण डाळींचे महत्त्व ओळखून ती सवय पुन्हा लावून घेणे ही आता काळाची गरज बनली आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :