मुंबई : शरीराचं कार्य सुरळीत व्हावं यासाठी अनेक अवयव महत्त्वाची भूमिका बजावतात. अशातच लिव्हर शरीराचा एक महत्त्वपूर्ण भाग असून त्याला यकृत असंही म्हटलं जातं. जर लिव्हरचं आरोग्य बिघडलं तर मृत्यू होण्याचाही धोका संभवतो. लिव्हरचं काम पचनक्रियेशी निगडीतही असतं. लिव्हरचं वजन 1.3 ते 1.6 किलोग्राम एवढं असतं. लिव्हर शरीरातील विषारी घटक पित्ताच्या स्वरूपात फिल्टर करण्याचं काम करतं आणि मल किंवा मूत्र स्वरूपात शरीरातून बाहेर टाकले जातात. लिव्हर शरीरामध्ये जवळपास 300 पेक्षा अधिक कामं करतं. लिव्हर रक्तामध्ये साखरेचं प्रमाण नियंत्रणात करण्याचं काम करतो. लिव्हरचं एक कार्य शरीरात रक्त तयार करणं हेदेखील आहे.


या लक्षणांकडे दुर्लक्षं करू नका

त्वचेचा रंग पिवळा होणं

लिव्हरचं काम बिघडतं तेव्हा याचा परिणाम त्वचेवर दिसून येतो. तसेच डोळ्यांमध्येही पिवळेपणा वाढतो. त्वचेचा रंग पिवळा पडणं, लघवीचा रंग पिवळा होणं यांसारखी लक्षणं दिसून आली तर वेळीच सावध व्हा.

उलटीमधून रक्त पडणं

जेव्हा सतत मळमळ होणं किंवा उलट्या येणं यांसारख्या समस्या वाढतात. त्यावेळी लिव्हरची समस्या असण्याती शक्यता असते. तसेच उलटी करताना त्यातून रक्त पडलं तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

हाता पायांना सूज येणं

लिव्हरचं आरोग्य बिघडतं त्यावेळी पोटाच्या खालच्या बाजूला सूज जाणवू लागते. तसेच हाता-पायांनाही सूज येते. जर तुम्हालाही ही समस्या जाणवत असेल तर दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक असतं.

थकवा जाणवणं

अनेकदा आपल्याला थकवा येत असेल तर हेदेखील लिव्हर खराब होण्याचे संकेत असू शकतात. थकवा येण्याची इतरही कारण असू शकतात. त्यामुळे योग्य कारण ओळखण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

जेवण बेचव लागत असेल तर

जेवणाची इच्छा होत नसेल किंवा चव लागत नसेल तर ही गंभीर समस्या असू शकते. तसेच तोंडातून दुर्गंधी येत असेल तर हेदेखील लिव्हर खराब होण्याचं लक्षण असू शकतं.

टीप : वरील सर्व गोष्टी केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. ABP यातून कोणताही दावा करत नाही.