जळगाव : भाजप नेते एकनाथ खडसे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजनांमध्ये अर्धा तास चर्चा झाली. विधानसभेला फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी आपल्याविरोधी भूमिका घेतल्याचा गंभीर आरोप एकनाथ खडसेंनी दोनच दिवसांपूर्वी केला होता. मात्र, त्यानंतर महाजनांना भेटल्यानंतर सगळं काही आलबेल दाखवण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे आजच्या बैठकीनंतर भाजप नेते खडसे आणि फडणवीस काय बोलताहेत हे पाहणं महत्वाचं होतं. मात्र, जिल्हा परिषदेच्या निवडणुकी व्यतिरिक्त कोणतीही चर्चा झाली नसल्याचं खडसे आणि महाजन यांनी सांगितले. तर, मी माझ्या भूमिकेवर ठाम असल्याचे खडसे यांनी माझाशी बोलताना सांगितले. त्यामुळे हे मनोमिलन केवळ निवडणुकीपुरतेच असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.


जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी आज निवडणूक होत आहे. त्यासाठी फडणवीस रात्री उशिराच जळगावात दाखल झाले. राज्यातील सत्ता हातून गेल्यानंतर आता जळगाव आणि नंदुरबारमधील पंचायत समिती राखण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे आणि गिरिश महाजन यांच्याशी चर्चा केली. दोनच दिवसांपूर्वी एकनाथ खडसेंनी थेट फडणवीस आणि महाजनांचं नाव घेऊन आरोप केले होते. या दोन्ही नेत्यांमुळेच आपलं तिकीट कापल्याचा गंभीर आरोप खडसेंनी केला होता. त्यामुळं भाजपात पुन्हा एकदा फडणवीस विरुद्ध खडसे असं चित्र निर्माण झालं आहे. त्यामुळे आजच्या भेटीत काय चर्चा होते याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते.

आमच्यात सर्व आलबेल -
आमच्यात सर्वकाही आलबेल असून पूर्वीप्रमाणेच आम्ही एकत्र असल्याची प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी फडणवीस आणि खडसे यांच्या भेटीनंतर दिली. संवाद व्यवस्थि न झाल्याने आमच्यात अडचणी आल्या होत्या. मात्र, आता सर्व ठिक असून जिल्हा परिषदेवर आमचीच सत्ता येणार असल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले. नावे जास्त असल्याने आम्ही फडणवीस यांच्याशी चर्चा करुन नावे निश्चित केल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा - जळगाव जिल्हा परिषदेवर कोणाचा झेंडा फडकणार? नाथाभाऊ किंगमेकरच्या भूमिकेत
माझ्या भूमिकेवर ठाम -
आजच्या चर्चेत केवळ निवडणुकीविषयी चर्चा झाल्याचे सांगत खडसेंनी नाराजीवर बोलण्याचे टाळले. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे आम्ही नावे पाठवली होती. त्याबाबतीतच आम्ही फडणवीस यांच्याशी चर्चा केल्याचे खडसे म्हणाले. दरम्यान, नाराजीवर कोणतीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

30 वर्षांपासून जळगाव जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता -
मागील 30 वर्षांपासून जळगाव जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता निर्विवाद सत्ता आहे. जळगाव जिल्हा परिषदेत एकूण सदस्य संख्या 67 आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा 1 सदस्य अपात्र ठरलेत. त्यामुळे 65 सदस्य मतदान करणार आहेत. यात भाजप 33, राष्ट्रवादी काँग्रेस 16, काँग्रेस 4 आणि शिवसेना 14, अशी सदस्य संख्या आहे. सध्या 4 काँग्रेस सदस्यांच्या जोरावर भाजपची सत्ता आहे. आता काँग्रेस महाविकास आघडीत असल्यानं भाजपचे 33 आणि महाविकास आघडीचे 32 असा सामना असल्यानं अटीतटीची लढत होणार आहे.

Mahajan and Khadse | आरोप-प्रत्यारोपानंतर एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र | ABP MAJHA