बीड : बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची उद्या (4 जानेवारी) निवड होणार आहे. या निवडणुकीमध्ये विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षाने आपल्या चार सदस्यांसाठीही बजावला आहे. विशेष म्हणजे मेटेंचे हे चार जिल्हा परिषद सदस्य यापूर्वीच भाजपमध्ये डेरेदाखल झाले होते. या व्हीपच्या जाहिराती बीडमधील विविध वृत्तपत्रांमध्ये देण्यात आल्या आहेत. तसंच घरात नसलेल्या सदस्यांच्या दारावर व्हीपची प्रत अडकवण्यात आली आहे.



पंकजा मुंडे आणि विनायक मेटे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे आणि म्हणूनच पंकजा मुंडे यांनी मागच्या दोन वर्षांमध्ये विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षाचे चारही जिल्हा परिषद सदस्य भाजपमध्ये घेतले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी उद्या भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये सत्तेसाठी मोठी रस्सीखेच होणार असताना, शिवसंग्राम पक्षानेही चार जिल्हा परिषद सदस्यांना व्हीप जारी केला आहे. त्याच्या जाहिरातीही आज बीडच्या स्थानिक वृत्तपत्रात देण्यात आल्या आहेत.

जयश्री राजेंद्र मस्के, अशोक चांदमल लोढा, भरत दशरथराव काळे आणि विजयकांत विक्रम मुंडे यांच्या नाव आणि पत्त्यासह या जाहिराती आज बीडच्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. जाहिरातीत म्हटलं आहे की,

"तुम्ही भारतीय संग्राम परिषद या पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडून आलेले असून बीड जिल्हा परिषदेमध्ये भारतीय संग्राम परिषद या पक्षाचे प्रतिनिधित्त्व करत आहात. दिनांक 04/01/2020 शनिवार रोजी होणाऱ्या बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या मतदानावेळी तुम्ही कोणालाही मतदान न करता तटस्थ राहावे असा पक्षादेश (WHIP)काढण्यात आलेला आहे. पक्षादेशाचे पूर्ण पालन करावे. पक्षादेशाचे पालन न केल्यास, उल्लंघन झाल्याचं निदर्शनास आल्यास आपल्याविरुद्ध पक्षविरोधी कार्यवाही केल्याबद्दल आपले सदस्यत्व रद्द करणे अथवा ततत्सम उउचित कार्यवाही करण्यात येईल."




या चारही जिल्हा परिषद सदस्यांनी शिवसंग्रामला सोडचिठ्ठी देत जाहीररित्या भाजपमध्ये प्रवेश केला आहे. असे असतानाही शिवसंग्राम मात्र उद्या होणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या निवडीमध्ये कोणताही चान्स घेत नाही.

चार जिल्हा परिषद सदस्य आपल्या ताब्यात नाही येत हे माहित असतानाही, शिवसंग्राम पक्षाने व्हीप बजावल्याने भविष्यात पुन्हा भाजप विरुद्ध शिवसंग्राम हा वाद उफळणार हे मात्र नक्की.