Health: थोड्याशा पायऱ्या चढल्या की तुम्हालाही धाप लागते का? दिवसभराचं काम आणि ऊर्जा याचा जवळचा संबंध आहे. बैठ्या जीवनशैलीमुळे आजकाल जरा धावलं किंवा चार पायऱ्या चढल्या की दम लागतो. थोडीशी शारीरिक हालचाल ही घामेघुम करून टाकते. यासाठी काय करायचं? 


दररोजच्या कामाच्या गडबडीत नकळतपणे आपल्या आरोग्यावर असंख्य परिणाम होत असतात. त्याकडे बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे. मोठ्या विकारांची मूळ यात दडलेली असू शकतात. थोडसं धावलं किंवा जिना चढल्यावर अनेकांना धाप लागते. श्वसनास अडथळा निर्माण होऊन श्वास गुदमरल्याचेही वाटू शकतं. पण यासाठी काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर आपल्यातली ऊर्जा चांगली राहून ही समस्या दूर होऊ शकते.


पायऱ्या हळू चढाव्या 


कितीही घाई असली तरी पायऱ्या चढताना घाईघाई केल्याने श्वास लागतो. सुरुवातीला थोड्या संथ गतीने पायऱ्या चढत नंतर हळूहळू वेग वाढवला तर शरीरावर ताण येत नाही. मुळात शरीरातील ऊर्जा कमी झाल्याने धाप लागत असल्याने यावर मुळापासून काही गोष्टी बदलण्याची गरज आहे. 


पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम 


सध्या धकाधकीच्या आयुष्यात अपुरी झोप आणि व्यायामाच्या अभावाने आपण अनेक त्रास ओढवून घेत असतो. मग धाप लागणं श्वास गुदमरणं अशा छोट्या छोट्या गोष्टीतून शरीराच्या कुरबुरी दिसू लागतात. यासाठी पुरेशी झोप घेणं आणि शरीराला व्यायामाची सवय लावणं अत्यंत आवश्यक आहे. 


श्वास घेण्याच्या पद्धतीनेही पडतो परिणाम 


पायऱ्या चढताना श्वास घेण्याच्या पद्धतीमुळे ही परिणाम होतो. वरवर श्वास घेतल्याने शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. आणि थोडीशी शारीरिक खर्च झाली तरी सुद्धा दम लागतो. अशावेळी दीर्घ श्वास घेण्याचा सल्ला दिला जातो. 


पुरेसे पाणी प्या 


शरीरात पाण्याची पातळी संतुलित ठेवणं अतिशय गरजेचं आहे. धावायला जाण्याआधी किंवा पायऱ्या चढण्याआधी घोटभर पाणी पिल्याने शरीरात ऊर्जा टिकून राहते. डिहायड्रेशन ची समस्या उद्भवत नाही. 


आहारात करा बदल 


संतुलित आहाराचा आणि शरीराचा जवळचा संबंध आहे. आहारात फळे पालेभाज्यांचा समावेश केल्याने शरीर सुदृढ राहते. दिवसभर ऊर्जा टिकून राहते. थोडसं चालल्यावर धाप लागत असेल तर आपल्यासोबत ड्राय फ्रुट्स किंवा एखादं चॉकलेट ठेवावे.