मुंबई: राज्याच्या राजकारणात आगामी निवडणुकीच्या दृष्टीने मोठ्या हालचाली सुरू आहे. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन होणार असा विश्वास अनेकदा महायुतीच्या नेत्यांकडून व्यक्त केला जातो. मात्र, याच महायुतीत पडद्यामागे काय घडतंय याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षातील अनेक मंत्र्याच्या फाईल्स मुख्यमंत्री कार्यालयात (CMO) रखडल्याची चर्चा सुरू आहे. 


राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाच्या) (NCP) अनेक फायलींचा प्रवास मुख्यमंत्री कार्यालयात (CMO) रखडला असल्याची चर्चा सुरू आहे. जवळपास आठरा ते वीस महत्त्वाच्या फाईल मुख्यमंत्री कार्यालयात (CMO) रखडल्या असल्याची माहिती आहे. शिवभोजन वाढीव थाळी यासारख्या अनेक निर्णय प्रलंबित असल्याची देखील माहिती सुत्रांकडून मिळते आहे. 


त्याचबरोबर अनेक राष्ट्रवादीच्या आमदारांच्या  (NCP MLAs and Ministers) मतदार संघातील कामांच्या फाईल देखील मुख्यमंत्री कार्यालयात अडकल्याची माहिती आहे. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या मतदारसंघातील आणि इतर महत्त्वाच्या कामांच्या फायली रखडल्याने राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार) गटाच्या मंत्र्यामध्ये आणि आमदारांमध्ये मोठी नाराजी दिसून येत आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, मंत्र्यांच्या पातळीवर विभागातील निर्णय होत आहेत. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पातळीवरील अनेक निर्णय रखडल्याने नाराजी व्यक्त होत आहे. महायुतीचं सरकार असल्यामुळे राष्ट्रवादीचे नेते उघडपणे नाराजी व्यक्त करत नाही मात्र खाजगीत मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली जात आहे, अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू आहे. 


तर आगामी निवडणुकीसाठी राज्यातील सर्व पक्षांनी आपापली तयारी सुरू केली आहे. आपल्या मतदारसंघातील कामे, बैठका, दौरे सुरू केले आहेत. अशातच आमदारांच्या फाईल्स अडकल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र आता महायुतीत सोबत असताना जाहीरपणे बोलणं आणि नाराजी व्यक्त करणं नेत्यांनी टाळल्याच्या चर्चा सुरू आहेत.