Hair Wash Tips : केसांना योग्य प्रकारे शॅम्पू (Shampoo) लावायचा हे तुम्हाला माहित आहे का? बहुतेक जण ओल्या केसांना थेट शॅम्पू लावतात. तर काही जण आधी कोरड्या केसांना शॅम्पू लावतात आणि नंतर पाण्याने केस ओले करतात. बहुतांश लोक केस (Hair) धुताना हीच पद्धत अवलंबतात. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की शॅम्पू लावण्याच्या या दोन्ही पद्धती चुकीच्या आहेत आणि तुमच्या केसांना हानी पोहोचवू शकतात. जर तुम्हाला तुमचे केस निरोगी आणि मजबूत ठेवायचे असतील तर शॅम्पू लावण्याची योग्य पद्धत जाणून घ्या.


प्रसिद्ध हेअरस्टायलिस्ट जावेद हबीब (Javed Habib) यांनी शॅम्पू लावण्याची योग्य पद्धत सांगितली आहे आणि हे देखील सांगितलं आहे की जर तुम्ही ही पद्धत अवलंबली तर तुमचे केस निरोगी आणि चमकदार होतील. चला जाणून घेऊया केस धुण्याची योग्य पद्धत कोणती?


शॅम्पू लावण्याची योग्य पद्धत कोणती?


जावेद हबीब यांच्या माहितीनुसार, केसांना थेट शॅम्पू लावण्याऐवजी आधी पाण्यात मिसळा आणि नंतर केसांना लावा. सर्वात आधी तुम्ही मगमध्ये थोडं पाणी घ्या आणि नंतर आवश्यकतेनुसार त्यात शॅम्पू ओतून विरघळवून घ्या. नंतर हे मिश्रण केसांना लावा आणि केस धुवून टाका. शॅम्पू थेट लावल्याने शॅम्पूमध्ये असलेली रसायने आणि सक्रिय संयुगे केसांच्या संपर्कात येतात, ज्यामुळे केसांचे नुकसान होण्याची शक्यता असते.






केस धुण्यापूर्वी तेल लावणं आवश्यक


दरम्यान केस धुवायच्याआधी केसांना तेल (Oil) लावलंच पाहिजे असं कायम सांगितलं जातं. याबाबत हेअरस्टायलिस्ट जावेद हबीब यांचं म्हणणं आहे की, केस धुण्यापूर्वी केसांना चांगले तेल लावा आणि 10 मिनिटे मसाज करा. तेल लावल्याने, शॅम्पूमध्ये असलेल्या रसायनांचा (Chemical) तुमच्या केसांवर फारसा परिणाम होत नाही. यामुळे तुमचे केस चमकदार आणि मऊ होतात. केसांचा कोरडेपणा निघून जातो आणि ते नुकसान होण्यापासूनही सुरक्षित राहतात.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.