Ganeshotsav 2024 Travel : जेव्हा भाविकांची आपल्या देवावर श्रद्धा असते, तेव्हा त्याला देव सृष्टीच्या चराचरात, कणाकणात दिसतो. देव हा माणसांमधील माणुसकीतही आहे. एकमेकांच्या आदर, माया, स्नेह, ऋणानुबंध यात आहे. म्हणूनच देव जपावा, देव पूजावा असं विविध धर्मात सांगण्यात आले आहे. सर्वांचं दु:ख हरण करणाऱ्या श्रीगणेशाचे (Lord Ganesh) भक्त केवळ भारतातच नाही, तर अवघ्या जगभरात आहे. याचेच उदाहरण म्हणजे श्रीगणेशाची भारतातच नव्हे तर परदेशातही पूजा केली जाते. थायलंड आणि मलेशियामध्येही गणेशाची मंदिरे आहेत.  जाणून घेऊया जगातील प्रसिद्ध गणपतीची मंदिरे कोठे कोठे आहेत?


 



मानवाच्या जीवनातील अडथळे दूर करणारा आणि समृद्धीची देवता म्हणून भगवान गणेशाची पूजा केली जाते. शुभ कार्य असो, जीवनाची नवीन सुरुवात असो किंवा प्रवासापूर्वी गणेशाची पूजा केली जाते. दरवर्षी गणेश चतुर्थीचा सण देशातील अनेक भागांमध्ये मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरा केला जातो, गणेश चतुर्थीच्या दिवशी लोक बाप्पाची मूर्ती घरी, सार्वजनिक ठिकाणी आणतात आणि 10 दिवस मनोभावे पूजा करतात. या 10 दिवसांमध्ये बाप्पाच्या मूर्तीच्या स्थापनेसाठी भव्य मंडप सजवले जातात, या दिवसात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. 10 व्या दिवशी गणेशमूर्ती नदीत किंवा तलावात विसर्जित केली जाते. 


 


भगवान गणेशाची अनेक मंदिरे भारतात प्रसिद्ध


भगवान गणेशाची अनेक मंदिरे भारतात खूप प्रसिद्ध आहेत. ज्यात मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर, महाराष्ट्रातील अष्टविनायक मंदिर, मधुर महागणपती मंदिर - केरळ, त्रिनेत्र गणेश - रणथंबोर, गणेश टोक मंदिर - गंगटोक आणि उची पिल्लयार मंदिर - तामिळनाडू यासारख्या अनेक मंदिरांचा समावेश आहे. मात्र भारताव्यतिरिक्त परदेशातही गणेश मंदिरांची स्थापना केली जाते. चला जाणून घेऊया परदेशातील गणपतीची प्रसिद्ध मंदिरे कोणती आहेत?



श्रीलंकेतील प्रसिद्ध गणेश मंदिर


श्रीलंकेत श्रीगणेशाची पिल्लियार म्हणून पूजा केली जाते. येथे गणेशाची अनेक प्रसिद्ध मंदिरे आहेत. अरियालाई सिद्धिविनायककर मंदिर आणि कटारगामा मंदिर हे गणेशाच्या सर्वात प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहेत.



थायलंड - हुआई क्वांग स्क्वेअर 


हुआई क्वांग स्क्वेअर हे थायलंडमधील गणपतीच्या मंदिरांपैकी एक आहे. मंदिरात रोज पूजा केली जाते. थायलंडमध्ये गणेशाची अनेक मंदिरे आहेत. याशिवाय थायलंडमधील चियांग माई येथे चांदीचे मंदिर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंदिराबाहेर गणेशाची चांदीची मूर्ती आहे.



सूर्यविनायक मंदिर, नेपाळ


सूर्यविनायक मंदिर हे नेपाळच्या भक्तपूर जिल्ह्यात स्थित एक हिंदू मंदिर आहे. हे मंदिर हिंदू भगवान गणेशाला समर्पित आहे. काठमांडूपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर हे मंदिर जंगलात असून तेथे पायी जाण्यासाठी एक मार्ग आहे. यासोबतच येथे दूरदूरवरून लोक दर्शनासाठी येतात. हे काठमांडू खोऱ्यातील गणपतीच्या चार लोकप्रिय मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर सूर्य मंदिर म्हणूनही ओळखले जाते. जलविनायक गणेश मंदिराची स्थापना नेपाळमध्ये आहे.



श्री सिथी विनायक मंदिर


श्री सिथी विनयागर मंदिर हे मलेशियातील सेलांगर येथील पेटलिंग जया येथे जालान सेलंगोरजवळ आहे. हे पीजे पिल्लैयार मंदिर म्हणूनही ओळखले जाते. येथे असलेली देवता श्री सिथी विनायक मंदिराच्या रूपातील भगवान गणेश आहे. असे म्हटले जाते की, हे मंदिर मलेशियातील गणपतीचे सर्वात मोठे आणि प्रसिद्ध मंदिर आहे.


 


श्री वरथराजा सेल्वविनायगर मंदिर, नेदरलँड


डेन हेल्डरमधील श्री वरथराजा सेल्वविनायगर मंदिर हे नेदरलँडमधील सर्वात जुने गणेश मंदिर आहे. हे मंदिर 1991 मध्ये श्रीलंकेतून आलेल्या तमिळ लोकांनी बांधले होते. हे मंदिर नेदरलँड्सच्या डेन हेल्डरमध्ये स्थापित केले आहे.


 


हेही वाचा>>>


Ganeshotsav 2024 Travel : 'जिथे बाप्पा स्वतः प्रकट झाले, अशी महाराष्ट्रातील 'ही' गणेश मंदिरं माहित आहेत?' गणेशोत्सावात भेट देण्यासाठी उत्तम ठिकाणं


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )