Health:  पावसाळा आला की आल्हाददायक वातावरणासोबत विविध आजार देखील घेऊन येतो. सध्या डेंग्यूचा आजार देशात बळावताना दिसतोय. डेंग्यू हा डासांमुळे होणारा एक गंभीर आजार आहे जो सहसा पावसाळ्यात अधिक वेगाने पसरतो. कर्नाटकात या आजाराची वाढती रुग्णसंख्या पाहता याला महामारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. वेळीच उपचार न मिळाल्यास हा आजार गंभीर स्वरूप घेऊ शकतो. अशा परिस्थितीत हा आजार धोकादायक का आहे? आणि तो कसे टाळावा? हे डॉक्टरांनी सांगितले.


 


कर्नाटकमध्ये वेगाने वाढतायत रुग्ण...


पावसाळा म्हणजे अनेक आजार आणि संसर्ग. या ऋतूमध्ये विविध प्रकारचे आजार अनेकदा लोकांना आपला बळी बनवतात. विशेषत: डासांमुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण या मोसमात लक्षणीय वाढते. डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, वेस्ट नाईल ताप, झिका व्हायरस हे डासांमुळे होणारे काही गंभीर आजार आहेत. यापैकी, डेंग्यू हा सर्वात सामान्य परंतु धोकादायक आजार आहे, ज्याचे रुग्ण सध्या कर्नाटकमध्ये वेगाने वाढत आहेत.


 


अनेकांना जीव गमवावा लागतो


राज्यातील डेंग्यूच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर, याला महामारी म्हणून घोषित करण्यात आली आहे. मान्सूनचे आगमन होताच देश-विदेशात त्याचे रुग्ण वाढू लागतात. दरवर्षी या आजारामुळे अनेकांना जीव गमवावा लागतो. यावर वेळीच उपचार आणि प्रतिबंध न केल्यास मृत्यू होऊ शकतो. अशा परिस्थितीत, या रोगाचे घातक परिणाम आणि प्रतिबंध याबद्दल तपशीलवार जाणून घेण्यासाठी, एका वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीनुसार वरिष्ठ डॉक्टर. मुझम्मिल सुलतान कोका यांनी याबाबत माहिती दिलीय.



डेंग्यूची लक्षणे


डॉक्टर म्हणतात, पावसाळ्यात डेंग्यूचे विषाणू झपाट्याने पसरत असल्याने याचा धोका वाढतो, या आजाराची संभाव्य तीव्रता लक्षात घेऊन कर्नाटकात डेंग्यूला साथीचा रोग घोषित करण्यात आला आहे, ही गंभीर चिंतेची बाब आहे. डेंग्यू नावाचा विषाणू डासांद्वारे पसरतो आणि त्यामुळे फ्लूसारखी लक्षणे उद्भवू शकतात. यामुळे उच्च ताप, वेदनादायक डोकेदुखी, पुरळ, सांधे आणि स्नायूंमध्ये वेदना यासारख्या समस्या उद्भवू शकतात.


 


डेंग्यूचे गंभीर परिणाम


त्याच्या गंभीर परिणामांबद्दल माहिती देताना डॉक्टरांनी सांगितले की, यावर योग्य वेळी उपचार न केल्यास डेंग्यू रक्तस्रावी तापात विकसित होऊ शकतो, ज्यामुळे रक्तस्त्राव, अवयव निकामी होणे आणि मृत्यूही होऊ शकतो.


 


डेंग्यू कसा टाळता येईल


डेंग्यूशी लढण्याची गुरुकिल्ली म्हणजे त्याचा प्रतिबंध असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत, काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे:



  • डासांची पैदास होऊ नये म्हणून...

  • घराच्या आजूबाजूला कुठेही पाणी साचू देऊ नका.

  • डास चावण्यापासून वाचण्यासाठी संरक्षणात्मक कपडे घाला.

  • डासांपासून बचाव करण्यासाठी डासप्रतिबंधकांचा वापर करा.

  • हा जीवघेणा आजार टाळण्यासाठी जनजागृती सर्वात महत्त्वाची आहे.


 


हेही वाचा>>>


Health: काय सांगता! मोबाईल फोनमुळे वाढतोय मेंदूच्या कर्करोगाचा धोका? नेमकं सत्य काय? WHO चा मोठा खुलासा, जाणून घ्या..


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )