Ganeshotsav 2024 Travel : गणपती बाप्पाच्या (Ganesh Chaturthi 2024) आगमनासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. बाप्पा येणार म्हणून सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे, विशेषत: मुंबई आणि पुण्यात एक बाप्पामय दृश्य सर्वत्र दिसत आहे. जिकडे-तिकडे ढोल-ताशाचे आवाज, नृत्य, गाणी, गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष आणि हवेत उधळणारे रंग, गुलाल, हे सारे दृश्य तुमच्या हृदयात कायमचे राहील. मुंबईत ज्याप्रमाणे सिद्धीविनायकाचे मंदिर जगप्रसिद्ध आहे, तसेच महाराष्ट्रातील गणेशाची काही मंदिरंही तितकीच प्रसिद्ध आहे, कारण या मंदिराबद्दल अशी आख्यायिका आहे की, या ठिकाणी बाप्पा स्वत: प्रकट झाले, ज्यामुळे यास स्वयंभू देवस्थान म्हटले जाते. या मंदिरांना तुम्ही भेट देऊन विघ्नहर्त्याचा आशीर्वाद मिळवू शकता...


 


स्वयंभू म्हणजे काय रे भाऊ?


महाराष्ट्रातील मुंबई तसेच पुण्याच्या आसपास विविध भागात श्री गणेशाची आठ मंदिरं आहेत, त्यांना अष्टविनायक म्हणतात. या मंदिरांना स्वयंभू मंदिरं असेही म्हणतात. स्वयंभू म्हणजे येथे देव स्वतः प्रकट झाले, याचाच अर्थ कोणीही त्यांची मूर्ती बनवून प्रतिष्ठापना केली नाही. गणेश आणि मुद्गल पुराण यांसारख्या विविध पुराणांमध्येही या मंदिरांचा उल्लेख आहे. ही मंदिरं अतिशय प्राचीन असून त्यांना ऐतिहासिक महत्त्वही आहे. या मंदिरांच्या यात्रेला अष्टविनायक तीर्थ असेही म्हणतात. ही ती आठ मंदिरं आहेत. अष्टविनायकाचा शब्दशः अर्थ 'आठ गणपती', ही सर्व मंदिरे महाराष्ट्रातील विविध 8 भागात आढळणाऱ्या बाप्पाच्या मंदिरांचा संदर्भ देतात. 



अष्टविनायक प्रवास करण्याचा योग्य मार्ग



  • येथे पहिली भेट - श्री मोरेश्वर - मोरगाव

  • दुसऱ्या क्रमांकावर श्री चिंतामणी विनायक - थेऊर

  • तिसऱ्या क्रमांकावर श्री सिद्धिविनायक -सिद्धटेक

  • चौथ्या क्रमांकावर, श्री महागणपती - रांजणगाव 

  • पाचव्या क्रमांकावर- श्री विघ्नहर-ओझर

  • सहाव्या क्रमांकावर - श्री गिरिजात्मज - लेण्याद्री

  • सातव्या क्रमांकावर श्री वरद विनायक - महड

  • आठव्या क्रमांकावर श्री बल्लाळेश्वर - पाली 



श्री मोरेश्वर - मोरगाव


पुण्यातील मोरगाव परिसरात मोरेश्वर विनायकाचे मंदिर आहे. अष्टविनायक यात्रेचा प्रारंभ हा मोरेश्वराच्या दर्शनाने केला जातो. मोरेश्वर गणपतीचे मंदिर हे पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील मोरगाव या गावात आहे. हे पुण्याच्या आग्नेय दिशेला स्थित आहे. हे मंदिर बारामतीपासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर आहे. तर पुण्यापासून सुमारे 80 किलोमीटर अंतरावर असलेल्या मोरेश्वर मंदिराच्या चारही कोपऱ्यांवर मोठे मिनार आणि लांब दगडी भिंती आहेत. पौराणिक आख्यायिकेनुसार सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग या चार युगांचे प्रतीक मानले जाणारे चार दरवाजे असे म्हटले जाते. येथे गणपतीची मूर्ती आसन स्थितीत आहेत. येथे नंदीची मूर्तीही आहे. याच ठिकाणी श्रीगणेशाने सिंधुरासुर नावाच्या राक्षसाला मोरावर स्वार करताना त्याच्याशी युद्ध करताना मारले होते, असे सांगितले जाते. म्हणूनच त्याला मयुरेश्वरही म्हणतात.





श्री चिंतामणी मंदिर - थेऊर



चिंतामणी मंदिर हे थेऊर गावात भीमा, मुळा आणि मुठा या तीन नद्यांच्या संगमावर आहे. अष्टविनायकांपैकी दुसऱ्या क्रमांकाचा गणपती म्हणजे चिंतामणी. चिंतामणी गणपतीचे मंदिर हे पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील थेऊर याठिकाणी आहे. थेऊर हे पुणे-सोलापूर महामार्गाच्या थोडेसे आडवाटेवर एका तासाच्या अंतरावर आहे. हे मंदिर पुण्यापासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. असे मानले जाते की जे या मंदिरात खऱ्या मनाने दर्शन घेतात, त्यांचे सर्व संभ्रम दूर होतात आणि त्यांना शांती मिळते. या मंदिराशी संबंधित अशी कथा आहे की ब्रह्मदेवाने स्वतःचे अस्वस्थ मन शांत करण्यासाठी या ठिकाणी तपश्चर्या केली होती.




श्री सिद्धिविनायक मंदिर - सिद्धटेक


सिद्धिविनायक गणपती मंदिर हे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील सिद्धटेक या ठिकाणी आहे. हेहे मंदिर पुण्यापासून 200 किमी अंतरावर भीमा नदीवर आहे. हे मंदिर सुमारे 200 वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते. सिद्धिविनायक मंदिर डोंगराच्या माथ्यावर बांधले आहे, जेथे भगवान विष्णूंनी सिद्धी प्राप्त केली होती, अशी आख्यायिका आहे. त्याचे मुख्य प्रवेशद्वार उत्तरेकडे आहे. या मंदिराला प्रदक्षिणा घालण्यासाठी डोंगरावर जावे लागते. सिद्धिविनायक मंदिरातील गणेशमूर्ती 3 फूट उंच आणि 2.5 फूट रुंद आहे. येथे श्रीगणेशाची सोंड सरळ हाताकडे आहे.




श्री महागणपती मंदिर - रांजणगाव


पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील रांजणगावात महागणपती मंदिर आहे. हे मंदिर 9व्या-10व्या शतकातील असल्याचे मानले जाते. अष्टविनायकांपैकी चौथ्या क्रमांकाचा हा गणपती आहे. या ठिकाणी गणपतीची मूर्ती ही उजव्या सोंडेची आहे. पुणे-अहमदनगर मार्गावर ओझरपासून 2 तासावर हे मंदिर आहे. मंदिराच्या पूर्वेला खूप मोठे आणि सुंदर प्रवेशद्वार आहे. येथे गणपतीची मूर्ती आहे.




श्री विघ्नेश्वर - ओझर


हे मंदिर पुण्यातील जुन्नर तालुक्यातील ओझर या ठिकाणी आहे. पाचव्या क्रमांकाचा गणपती आहे विघ्नेश्वर. पुणे-नाशिक रस्त्यावर सुमारे 85 किलोमीटर अंतरावर हे मंदिर बांधले आहे. एका पौराणिक कथेनुसार विघ्नासूर नावाचा राक्षस मुनींचा छळ करत असताना श्रीगणेशाने या ठिकाणी त्याचा वध केला. तेव्हापासून हे मंदिर विघ्नेश्वर, विघ्नहर्ता आणि विघ्नहर म्हणून ओळखले जाते.  


 





श्री गिरिजात्मज - लेण्याद्री


पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील लेण्याद्री गावात गिरिजात्मज अष्टविनायक मंदिर आहे, सहाव्या क्रमांकाचा गणपती आहे. ज्याचा अर्थ गिरिजाचा आत्मा, माता पार्वतीचा पुत्र म्हणजेच गणेश आहे. हे मंदिर पुणे-नाशिक महामार्गावर पुण्यापासून 90 किलोमीटर अंतरावर आहे. हे लेण्याद्री पर्वतावरील लेण्यांमध्ये बांधले आहे. या लेणीमध्ये गिरिजात्मज विनायक मंदिर आहे. या लेण्यांना गणेश लेणी असेही म्हणतात. नाशिक फाटा-चाकण-राजगुरुनगर-नारायणगांव-जुन्नर यामार्गे अडीच तासांच्या अंतरावर आहे. मंदिरात जाण्यासाठी सुमारे 300 पायऱ्या चढून जावे लागते. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे संपूर्ण मंदिर एकच मोठा दगड पोखरून बांधण्यात आले आहे.





श्री वरदविनायक मंदिर - महड


रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील महड येथे वरदविनायक मंदिर आहे. एका मान्यतेनुसार वरदविनायक भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करण्याचे वरदान देतात. या मंदिरात नंददीप नावाची दीपमाळ असल्याचेही सांगितले जाते. वरदविनायक हा सातव्या क्रमांकाचा गणपती आहे. हे मंदिर रायगड जिल्ह्यातील खोपोलीपासून 6 किलोमीटर अंतरावर आहे.




श्री बल्लाळेश्वर मंदिर - पाली


कोकणातील रायगडच्या पाली गावातील या मंदिराचे नाव श्री बल्लाळेश्वर म्हणजेच बल्लाळ या गणेशभक्ताच्या नावावरून पडले आहे. आठव्या क्रमांकाचा गणपती आहे बल्लाळेश्वर. बल्लाळच्या कथेबद्दल असे म्हटले जाते की, बल्लाळला त्याच्या गणेशावरील भक्तीमुळे कुटुंबाने गणेशमूर्तीसह जंगलात सोडून दिले होते. जिथे तो फक्त गणपतीच्या आठवणीतच वेळ घालवायचा. यावर प्रसन्न होऊन या ठिकाणी बल्लाळला श्रीगणेशाचे दर्शन झाले आणि पुढे हे मंदिर बल्लाळच्या नावाने बांधण्यात आले. हे मंदिर पुण्यापासून 111 किलोमीटर अंतरावर आहे. पुण्याहून चांदणी चौक-पाषाण-बालेवाडी-महामार्गे दोन तासांच्या अंतरावर आहे. तर रायगड जिल्ह्यातील खोपोलीपासून 38 किलोमीटर अंतरावर आहे.




हेही वाचा>>>


Ganesh Chaturthi 2024: जिथे मंदिर उभारायला बाप्पा स्वतः पृथ्वीवर अवतरले? गणेशाचे एक अनोखे मंदिर, शंकराच्या अधिवासाने पवित्र झालेली भूमी


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )