Ukdiche Modak Recipe : गणपती बाप्पाचं आगमनाची घरात जशी मखर, सजावट, फुलांचा हार, प्रसाद यांच्यासाठी तयारी केली जाते. तशीच गृहिणींची बाप्पाच्या नैवेद्यामध्ये उकडीचे मोदक बनवण्यासाठी लगबग सुरू असते. बाप्पाच्या नैवेद्यामध्ये आणि शिदोरीमध्ये हमखास उकडीच्या मोदकांचा समावेश असतो. पण उकडीचे मोदक बनवण्यासाठी गृहीणींच्या पाककौशल्याची कसोटी लागते. जाणून घ्या उकडीचे मोदक तयार करण्याची रेसिपी...


मोदकासाठी लागणारे साहित्य



  • एक वाटी तांदुळाची पिठी (तांदूळ धुऊन, सावलीत वाळवून, दळून चाळलेली)

  • साखर किंवा गूळ - एक वाटी

  • नारळ - एक वाटी

  • तूप - दोन चमचे

  • वेलची पूड

  • तेल

  • भाजून कुटलेली अर्धी वाटी खसखस पूड (आवडत असल्यास)


सारण बनवण्याची कृती


- मोदकासाठी सारण बनवताना खोवलेल्या नारळात साखर किंवा गूळ घालून ते मंद आचेवर शिजत ठेवावे. 
- शिजताना ते मधून मधून हालवावे. जेणेकरून ते तळाला चिकटू नये. 
- शिजत आल्यावर त्यात चमचाभर तांदळाची पिठी व खसखस पूड घालावी.
- त्यानंतर वेलची पूड घालून सारण हालवावे. आणि पुन्हा थोडे शिजवावे. 


उकड 


- तांदळाच्या पिठीप्रमाणे पाणी उकळून घ्यावे.
- पाण्यात चवीपुरतं मीठ, दोन चमचे तूप आणि अर्धा चमचा तेल घालावे.
- पाणी उकळल्यानंतर त्यात पिठी घालून ते हालवावे. 
- झाकण ठेवून मंद गॅसवर दोन वाफा काढाव्या.
- उकड गरम असतानाच एखाद्या भांड्याच्या मदतीने मळावी.
- हाताने मळण्याइतपत झाल्यानंतर तेल किंवा पाण्याचा हात लावत मोदक घडवता येईल इतपत मऊसर ठेवावे.


मोदकाची कृती


- उकडीचे लहान गोळे करून त्याची हाताने पारी बनवावी. 
- वाटीचा आकार देऊन त्यात सारण भरावे आणि पारीच्या कडा थोड्या थोड्या अंतरावर चिमटीने दाबून बंद कराव्या व टोक आणावे. 
- मोदकाच्या कळ्या नेहमी विषम संख्येत म्हणजे तीन, पाच, सात किंवा नऊ अशा पाडाव्यात आणि त्यात सारण भरावे. 
- तयार केलेले मोदक केळीच्या पानावर थोडे तुपाचे बोट लावून उकडायला ठेवावे. आणि गरम असतानाच त्यावर साजूक तूप घालून खायला द्यावे.


उद्या होणार बाप्पाचं आगमन


उद्या 31 ऑगस्ट 2022 रोजी म्हणजेच (बुधवारी) बाप्पाचं आगमन होणार आहे. कोरोना काळानंतर यावर्षी सगळेच सण, उत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरे केले जात आहेत. त्यामुळे आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत करण्यासाठी गणेश भक्तांमध्येही मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळतो आहे.


संबंधित बातम्या


Ganesh Chaturthi Recipe : बाप्पाच्या प्रसादाचा विचार करताय? जाणून घ्या पौष्टिक मोदकाची कृती...


Ganesh Chaturthi Recipe: घरच्या घरी झटपट बनवा पान मोदक, पाहा रेसपी