Ganesh Chaturthi 2024 Travel :  भारतात तशी अनेक पवित्र आणि प्रसिद्ध मंदिरं आहेत. भारताचे हृदय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मध्य प्रदेशातील उज्जैन येथे वसलेले महाकालेश्वर मंदिर (Mahakaleshwar Mandir) हेही जगप्रसिद्ध मंदिर असल्याने अनेकांना माहित आहे. महाकालेश्वरप्रमाणेच, उज्जैनमध्ये असलेले चिंतामण गणेश (Chintaman Ganpati) मंदिर हे भारतातील प्रसिद्ध गणेश मंदिरांपैकी एक मानले जाते. सध्या गणेश चतुर्थीनिमित्त (Ganesh Chaturthi) सर्वत्र जोरदार तयारी आहे. गणेशोत्सव 7 सप्टेंबरपासून साजरा करण्यात येणार आहे. आज आम्ही तुम्हाला उज्जैनमध्ये असलेल्या चिंतामण गणेश मंदिराचा इतिहास आणि मंदिराशी संबंधित काही रंजक गोष्टी सांगणार आहोत. गणेश चतुर्थीनिमित्त या मंदिरात मोठी गर्दी असते.


 


शंभर वर्षांहून अधिक जुनं मंदिर


चिंतामण मंदिराचा इतिहास खूप रंजक आहे. मंदिराच्या इतिहासाबाबत असे म्हटले जाते की, ते शंभर वर्षांहून अधिक जुने आहे. हे पवित्र मंदिर 11व्या आणि 12व्या शतकाच्या आसपास परमार शासकांनी बांधले होते असे अनेकांचे मत आहे. त्यामुळे हे मंदिर स्थानिक शहरासाठी तसेच संपूर्ण मध्यप्रदेशासाठी खूप खास आहे.


 


चिंतामण मंदिराची पौराणिक कथा


चिंतामण मंदिराची पौराणिक कथा भाविकांसाठी खूप खास आहे. या पवित्र मंदिराबाबत भाविकांच्या दोन श्रद्धा आहेत. 


पहिली- या पवित्र मंदिराच्या उभारणीसाठी भगवान गणेश स्वतः पृथ्वीवर आले असे म्हणतात.
दुसरी श्रद्धा- धार्मिक मान्यतेनुसार चिंतामण गणेश मंदिराची स्थापना भगवान रामाने केली होती. लोककथेनुसार या मंदिराची स्थापना प्रभू रामाने वनवासात केली होती.





गणेश चतुर्थीला लाखो भाविक दर्शनासाठी येतात


गणेश चतुर्थीच्या विशेष मुहूर्तावर हे मंदिर नववधूप्रमाणे सजवले जाते. गणेश चतुर्थीनिमित्त लाखो भाविक दर्शनासाठी येतात. असे म्हटले जाते की, श्रीगणेश खऱ्या मनाने दर्शनासाठी आलेल्या कोणत्याही भक्ताच्या सर्व चिंता दूर करतात. गणेश चतुर्थीच्या खास निमित्ताने मंदिराभोवती जत्रेचे आयोजन केले जाते. याशिवाय मंदिराभोवती खाद्यपदार्थांचे स्टॉलही लावण्यात आले आहेत.


 


दर्शन वेळा आणि शुल्क


तुम्ही कुटुंब आणि मित्रांसह चिंतामण गणेश मंदिराला भेट देऊ शकता. तुम्ही जर महाकाल मंदिराला भेट देण्याचा विचार करत असाल तर, आम्ही तुम्हाला सांगतो की, ते महाकाल देवस्थानपासून 20 मिनिटांच्या अंतरावर आहे.चिंतामण मंदिर सकाळी 8.00 ते रात्री 8.00 पर्यंत खुले असते.


शुल्क : मंदिरात जाण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.


 


चिंतामण गणेश मंदिराच्या आसपास पाहण्यासारखी ठिकाणे


चिंतामण गणेश मंदिराच्या आजूबाजूला भेट देण्यासाठी अनेक उत्तम ठिकाणे आहेत. तुम्ही कुटुंब, मित्र आणि जोडीदारासोबत या ठिकाणांना कधीही भेट देऊ शकता. चिंतामण गणेश मंदिराच्या परिसरात असलेले महाकालेश्वर मंदिर, कालियादेह पॅलेस, भर्त्रीहरी लेणी आणि सांदीपनी आश्रम याशिवाय शिप्रा नदीच्या काठावरील सुंदर दृश्यांचा आनंद घेता येतो.


 


चिंतामण गणेश मंदिरात कसे पोहचाल?


चिंतामण गणेश मंदिरात देशाच्या कोणत्याही भागातून सहज पोहोचता येते. रेल्वे, रस्ता किंवा हवाई मार्गानेही पोहोचता येते.


रेल्वे मार्ग- उज्जैन जंक्शन रेल्वे स्टेशन चिंतामण गणेश मंदिराजवळ आहे. उज्जैन रेल्वे स्थानकावरून तुम्ही टॅक्सी, कॅब किंवा ऑटोने सहज जाऊ शकता. हे मंदिर रेल्वे स्टेशनपासून सात किमी अंतरावर आहे.


हवाई मार्ग - चिंतामण गणेशचे सर्वात जवळचे विमानतळ अहिल्याबाई होळकर विमानतळ आहे. विमानतळापासून मंदिराचे अंतर सुमारे 58 किमी आहे. तुम्ही विमानतळावरून टॅक्सी, कॅब किंवा ऑटोने सहज जाऊ शकता.


रस्त्याने- तुम्ही देशाच्या कोणत्याही भागातून रस्त्याने उज्जैनला पोहोचू शकता. मध्य प्रदेशातील जवळपास प्रत्येक शहरातून उज्जैनपर्यंत बसेस धावतात.


 


हेही वाचा>>>


Ganesh Chaturthi 2024 : 'तूच सुखकर्ता..!' भारतातील 'ही' प्राचीन, रहस्यमयी गणेश मंदिरं, फार कमी लोकांना माहित, एकदा पाहाच..


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )