Dasara 2024: आज दसरा.. म्हणजेच विजयादशमी..रामायणानुसार आज प्रभू रामाने रावणाचा वध केला होता. वाईटावर चांगल्याचे प्रतीक असलेला विजयाचा सण दसरा आज भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. देशात अनेक ठिकाणी आज रावणाच्या पुतळ्यांचे दहन करण्यात येत आहे. भव्य आतिषबाजीही करण्यात येते, पण भारतात असे एक ठिकाण आहे, जिथे दसऱ्याच्या दिवशी उत्सव नाही, तर शोक व्यक्त केला जातो. विशेष म्हणजे या ठिकाणाला रावणाची सासरवाडी असेही म्हणतात, ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, रावणाने मंदोदरीसोबत येथे भेट दिली होती. 



मंदोदरी होती मंदोरची राजकन्या!


आम्ही ज्या ठिकाणाबद्दल सांगत आहोत, ते ठिकाण राजस्थानच्या जोधपूरमध्ये आहे, ज्याला मंदोर म्हणतात. पौराणिक कथांनुसार रावणाची पत्नी मंदोदरी ही मंदोरची राजकन्या होती आणि तिचा विवाह याच ठिकाणी झाला होता असे म्हणतात. मात्र, याचा कोणताही ठोस पुरावा नाही. मंदोरचे जुने नाव पूर्वी मांडव्यपूर किंवा मांडवपूर होते. त्यावेळी मारवाडची राजधानी असायची, पण राव जोधा यांना हे ठिकाण असुरक्षित वाटू लागले, म्हणून त्यांनी चिडिया कूट टेकडीवर एक मोठा किल्ला बांधला, ज्याचे नाव मेहरानगड आणि शहराचे नाव जोधपूर ठेवण्यात आले. तर जोधपूर हे मंदोदरी आणि रावणाशी संबंधित ठिकाण, रावणाची चावरी पर्यटन विभागाच्या अखत्यारीत आहे. सध्या, मंदोर बागेत झनाना महाल, एक थंबा महाल, जोधपूर आणि मारवाडच्या महाराजांची मंदिरे आणि चौथ्या शतकातील एक प्राचीन किल्ला देखील आहे.


 


विजयादशमीला रावणाची पूजा


दुसरीकडे, विजयादशमीच्या दिवशी जोधपूरमधील श्रीमाली ब्राह्मण समाजातील दवे गोधा गोत्र परिवाराकडून शोक व्यक्त केला जातो. जोधपूरमध्येच असलेल्या किला रोडवर असलेल्या अमरनाथ महादेव मंदिराच्या आवारात रावणाचे मंदिर बांधण्यात आले असून तेथे रावणाची पूजा केली जाते. दसऱ्याच्या दिवशी मंदिराच्या आवारात रावणाच्या मूर्तीला विधीपूर्वक अभिषेक करून पूजा केली जाते. संध्याकाळी, रावण दहनानंतर, दवे गोधा वंशजांचे कुटुंब स्नान करतात.


 


ती कुटुंबं रावणदहन पाहत नाहीत..


एका वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीनुसार जोधपूरच्या महादेव अमरनाथ मंदिराचे पंडित कमलेश कुमार दवे यांनी सांगितले की, रावण दवे गोधा गोत्रातील होते, त्यामुळे आजही रावणदहनाच्या वेळी त्यांच्या गोत्रातील कुटुंबे रावणदहन पाहत नाहीत आणि शोक करतात. रावणाच्या मूर्तीजवळ मंदोदरीचे मंदिर आहे, तिचीही पूजा यावेळी केली जाते. दवे यांनी सांगितले की, 2008 साली कायद्यानुसार मंदिरात रावणाची मूर्ती बसवण्यात आली होती. तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक विजयादशमीला रावणाची पूजा केली जाते.


 


हेही वाचा>>>


Dasara 2024 Travel: एकीकडे प्रभू रामाची भक्ती, तर भारतात 'या' ठिकाणी होते चक्क रावणाची पूजा! देवासमान मानतात..


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )