Dussehra 2024 Shastra Puja : हिंदू धर्मात दसऱ्याच्या (Dussehra 2024) दिवशी शस्त्र पूजन केलं जातं. अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दहाव्या तिथीला दसरा साजरा केला जातो. पंचांगानुसार, यंदा 12 ऑक्टोबरला दसरा साजरा केला जात आहे. दसऱ्याला विजयादशमी असंही म्हणतात. या दिवशी अपराजिता देवी पूजन शमी पूजनआणि रावण दहन केलं जातं.
दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. पौराणिक कथेनुसार,या दिवशी दुर्गा देवीने देवी चंडीकेचं रुप धारण करुन महिषासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. तसेच, याच दिवशी रावणाशी युद्ध करण्यापूर्वी रामाने त्याच्या शस्त्रांची पूजा केली. त्याच वेळी महिषासुराशी युद्धासाठी देवतांनी मिळून दुर्गा देवीच्या शस्त्रांची पूजा केली. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी शस्त्र पूजनाला विशेष महत्त्व आहे. यंदा शस्त्र पूजनासाठी शुभ मुहूर्त कोणता? जाणून घेऊया.
दसरा 2024 कधी?
पंचांगानुसार, अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमी तिथी 12 ऑक्टोबरच्या सकाळी 10:58 वाजता सुरू झाली आहे. 13 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 9 वाजून 8 मिनिटांनी दसरा तिथी संपेल. उदयतिथीनुसार, यावर्षी दसरा 12 ऑक्टोबर 2024 रोजी साजरा केला जाणार आहे.
शस्त्र पूजनासाठी शुभ मुहूर्त
दसऱ्याच्या दिवशी विजय मुहूर्तामध्ये शस्त्र पूजा केली जाते. या दिवशी विजय मुहूर्त दुपारी 2 वाजून 3 मिनिटं ते 2 वाजून 49 मिनिटापर्यंत असेल. या मुहूर्तावर शस्त्रांची पूजा करता येईल.
दसऱ्याला 4 दुर्मिळ योग
1. रवि योग
2. शश योग
3. मालव्य योग
4. सर्वार्थ सिद्धी योग
या शुभ योगांत कोणतंही काम केल्यास ते यशस्वी होतं, असं सांगितलं जातं. दसऱ्याला रवि योग दिवसभर असल्यामुळे या दिवशी सर्व प्रकारचे दोष दूर होतील. तसेच सकाळी 6 वाजून 20 मिनिटांपासून ते रात्री 9 वाजून 8 मिनिटांपर्यंत सर्वार्थ सिद्धी योग असेल.
दसऱ्याला शस्त्र पूजेची पद्धत
दसऱ्याच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठावं. अंघोळीनंतर चांगले कपडे घाला. यानंतर विजय मुहूर्तावर शस्त्रांची पूजा सुरू करा. सर्व शस्त्रांवर गंगाजल शिंपडून शुद्ध करा. यानंतर हातांवर हळद-कुंकवाचा टिळा लावावा. नंतर फुलं आणि शमीची पानं अर्पण करा. गरीब आणि गरजूंना अन्न द्या, यानंतर दान करू शकता. नवरात्रीच्या नऊ दिवसांनी दशमी तिथीला यश देवो बोलून देवीचं स्मरण करून शस्त्रांची पूजा करावी. विजयादशमीच्या दिवशी कालिका मातेची पूजा केली जाते. हा दिवस अत्यंत शुभ असतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: