Beauty Tips : हिवाळ्यात (Winter Season) त्वचेचा कोरडेपणा खूप वाढतो, त्यामुळे त्वचेशी संबंधित समस्या खूप त्रासदायक ठरतात. हिवाळ्यात अनेकजण चेहरा आणि हातांची काळजी घेतात. पण, पायांकडे मात्र दुर्लक्ष करतात. त्यामुळे पाय घाण आणि बॅक्टेरियाच्या संपर्कात येतात. विशेषत: हिवाळ्यात पायांच्या तळव्यांना आणि टाचांवर मृत त्वचा (डेड स्किन) साचल्याने अनेक समस्या निर्माण होतात. अशा वेळी पाय स्वच्छ आणि सॉफ्ट करण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन खूप पैसे खर्च करण्याची गरज नाही. खरंतर, पायांवर जमा झालेल्या मृत त्वचेच्या पेशी घरी सहजपणे काढल्या जाऊ शकतात. यासाठी नेमके कोणते उपाय आहेत ते जाणून घेऊयात.
मृत त्वचेचा थर साचल्यामुळे, पायांचे तळवे आणि टाचांची त्वचा हिवाळ्यात खूप कडक होते. घरगुती स्क्रब आणि काही घरगुती उपायांच्या मदतीने मृत त्वचा तर स्वच्छ होईलच पण तुमच्या पायाची त्वचाही मऊ होईल.
साखर आणि लिंबाचा स्क्रब
लिंबू व्हिटॅमिन सी आणि ऍसिडिक गुणधर्मांनी समृद्ध आहे. लिंबू केवळ त्वचा स्वच्छ करण्यासाठीच नाही तर त्वचेवरील रंग सुधारण्यासाठी देखील उपयुक्त आहे. स्क्रब बनवण्यासाठी लिंबाच्या रसामध्ये साखर मिक्स करा आणि पायाच्या तळव्यांवर लावून मसाज करा. पण, त्याआधी तुमचे पाय कोमट पाण्यात सुमारे 15 ते 20 मिनिटं ठेवा आणि नंतर टॉवेलने पुसून स्क्रब करा.
सैंधव मिठाने स्क्रब तयार करा
पायाच्या तळव्यांवरील मृत त्वचा काढून टाकण्यासाठी आणि टाचांच्या भेगा दूर करण्यासाठी, ऑलिव्ह ऑईल आणि आवश्यक तेलाचे काही थेंब रॉक सॉल्टमध्ये घाला आणि चांगले मिक्स करा. एकदा ग्राइंडरमध्ये बारीक करा किंवा काही काळ बाजूला ठेवा, जेणेकरून जाड मीठ विरघळू लागेल. हा स्क्रब तुम्ही शरीरावरही लावू शकता. गोलाकार हालचालीत हळूवारपणे पायांवर स्क्रब करा आणि कोमट पाण्याने त्वचा स्वच्छ करा.
बेकिंग सोड्याने मृत त्वचा स्वच्छ होईल
मृत त्वचेमुळे पाय फार कडक होतात. अशा वेळी कोमट पाण्यात एक ते दीड चमचा बेकिंग सोडा मिक्स करा आणि त्यात पाय सुमारे 20 ते 30 मिनिटे ठेवा. यानंतर, प्युमिस स्टोन किंवा मऊ ब्रशच्या मदतीने मृत त्वचा स्वच्छ करा. यानंतर, टॉवेलने पाय नीट पुसून घ्या आणि मॉइश्चरायझर लावा.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.