work life balance: कोणत्याही नोकरीत कामाचे तास ठरलेले असतात, पण खरंच आपण तेवढेच तास काम करतो का? व्हाट्सअप, ऑनलाइन मीटिंग सोशल मीडिया यासारख्या कित्येक माध्यमातून आपण कामाचे अपडेट सतत चेक करत असतो. कॉर्पोरेट नोकऱ्यांमध्ये तर ओव्हरटाइमची संकल्पना नवीन नाही. पण पगार मिळतोय तेवढेच तास काम करा. तुमचे कामाचे तास भरल्यानंतर मॅनेजर फोनही करू शकत नाही असा कायदाच केला एका देशाने. कार्यालयीन वेळेनंतर कारवाईच्या कोणत्याही भीती शिवाय आणि कार्यालयीन वेळेनंतर फोन कॉल्स आणि टेक्स्ट मेसेज कडे या देशातले नोकरदार आता कायदेशीररित्या दुर्लक्ष करू शकतात.
ऑस्ट्रेलियन कर्मचाऱ्यांना कामाच्या वेळेनंतर डिस्कनेक्ट होण्याचा अधिकार मिळालाय. ज्या देशांमध्ये असा कोणताही कायदा नाही तेथील कर्मचाऱ्यांनी फोनला उत्तर न दिल्यास किंवा त्यांना सांगितलेले काम न केल्यास शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. अशी भीती वाटू नये म्हणून ऑस्ट्रेलियात आता असा कायदाच करण्यात आलाय. इथल्या नवीन नियमानुसार कोणताही कर्मचारी त्याच्या ठरलेल्या तासानंतर ऑफिसच्या कामांना किंवा त्या संदर्भात उत्तर देण्यास स्पष्टपणे नकार देऊ शकतो.
ऑस्ट्रेलियन नोकरदारांना मिळाला दुर्लक्ष करण्याचा अधिकार
कोणताही कर्मचारी सशुल्क कामाच्या तासानंतर कामाच्या संदर्भातील संदेश वाचण्यास निरीक्षण करण्यास किंवा कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद देण्यास स्पष्टपणे नकार देऊ शकतो. जेव्हा लोकांना 24 तास पगार मिळत नाही तेव्हा त्यांना दिवसाच्या 24 तास काम करावे लागत नाही असं तिथला पंतप्रधानांनी अंथनी अल्बानी यांनी सांगितलंय.
ते म्हणाले अनेक ऑस्ट्रेलियन लोकांसाठी कामाच्या तासानंतर फोनवर किंवा ईमेलवर 24 तास सक्रिय असणे हे निराशा जनक आहे. काम झाल्यानंतर ही तर पुन्हा पुन्हा तपासत राहतात. ही मानसिक आरोग्याची समस्या आहे.
असा अधिकार का दिला गेला?
आपल्या दैनंदिन आयुष्याचा एक भाग आपल्या स्वतःसाठी स्वतंत्र असावा हा यामागचा हेतू असून काम आणि वैयक्तिक जीवनाचा आदर करण्यासाठी याची गरज असल्याचे तिथल्या मंत्र्यांनी सांगितलं.
जर दुसऱ्या दिवसापर्यंत थांबता येत असेल तर कमी पगारावर असलेल्या कर्मचाऱ्यांवर दैनंदिन कामांसाठी कार्यालयानंतर कॉलचा भार पडू नये तसेच ग्राहक सेवा कर्मचारी जाहिरात कामगार यांच्यासारख्या क्षेत्रातील अनेकांना कमी पगारात अधिक राबवण्यात येत असल्याची तक्रार अनेक दिवसांपासून येत असल्याचे सांगण्यात आले.
वैयक्तिक कामांना चिंतामुक्त वेळ मिळेल
ऑफिस झालं तरीही ऑफिसचे ईमेल आणि मेसेज चेक करणाऱ्यांचे प्रमाण ऑस्ट्रेलियामध्येही अधिक आहे. कोरोना नंतर ई-मेल आणि मेसेज कॉल वर बरंच काम सुरू झाल्याने तुमच्या आयुष्यासाठी चिंतामुक्त असा वेळ मिळत नाही. परिणामी कार्यालयात तणावाचं वातावरण निर्माण होतं. या परिस्थितीवर ऑस्ट्रेलियन सरकारनं थेट कायदाच केलाय.