नवी दिल्ली : तुम्हाला रात्री झोप लागत नाही? जर उत्तर हो असेल, तर यामागे फक्त मानसिक तणाव हे एकमेव कारण नाही. एका अभ्यासानुसार, रात्री झोप न लागण्याला हवा प्रदूषणही कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण एका अभ्यासाअंती हे सिद्ध झाले आहे.


मानसिक तणाव हे झोपमोड होण्याला मुख्य कारण असल्याचं आतापर्यंत मानलं जायचं. मात्र, हवा प्रदूषणही झोपमोड होण्याला कारण असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे.


आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना हवा प्रदूषण हे एक कारण आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) माहितीनुसार, जर प्रदूषणाची पातळी कमी झाली, तर हृदयाचे विकार, फुफ्फुसाचे आजार, श्वसनसंस्थेशी निगडीत आजार, अस्थमा यांसारखे आजार कमी होण्यास मदत होते.


संशोधकांनीही झोपमोड होण्याला हवा प्रदूषण कारणीभूत असल्याचे सांगितले आहे. नायट्रोजन डायऑक्साईडच्या संपर्कात अधिक आल्याने आणि पीएम लेव्हल 2.5 राहिल्यास झोपमोड होण्याची शक्यता असते.

संशोधनानुसार, ट्राफिकमधून होणारा हवा प्रदूषण नायट्रोजन डायऑक्साईड (NO2) नावाने ओळखला जातो. यामुळे झोप कमी होते. म्हणजेच रात्री उशिरा झोप लागते, तर सकाळी लवकर जाग येते.

वॉशिंग्टन यूनिव्हर्सिटीचे असिस्टंट प्रोफेसर मार्थ ई. बिलिंग्स यांच्या म्हणण्यानुसार, संशोधनंही या गोष्टीकडे लक्ष वेधतात की, हवा प्रदूषणामुळे केवळ हृदय आणि फुफ्फुसावरच परिणाम होत नाही, तर झोपेवरही परिणाम होतो.

हवा प्रदूषणामुळे नाकाच्या वरील बाजूस परिणाम होतो. त्याचसोबत, सेंट्रल नर्व्हस सिस्टम, ब्रेन एरिया, जिथून श्वास आणि झोप यांच्यावर नियंत्रण ठेवलं जातं, त्यावरही परिणाम होतो.

सूचना : वरील वृत्त संशोधकांच्या दाव्यांनुसार असून, एबीपी माझा याला दुजोरा देत नाही. कोणतेही उपचार सुरु करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.