मुंबई : आपल्या विनोदी आणि दमदार अभिनयासाठी ओळखले जाणारे बॉलिवूड अभिनेते परेश रावल सध्या त्यांच्या एका ट्वीटमुळे चर्चेत आहेत. परेश रावल यांनी प्रसिद्ध लेखिका अरुंधती रॉय यांच्याबाबत ट्वीट केलं आहे.


काही दिवसांपूर्वी काश्मीरमध्ये भारतीय जवानांच्या जीपला एका तरुणाला बांधलं होतं, त्यासंदर्भात परेश रावल यांनी ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये परेश रावल यांनी लिहिलं आहे की, "दगफेक करणाऱ्याला जीपला बांधण्यापेक्षा अरुंधती रॉय यांना बांधा."

https://twitter.com/SirPareshRawal/status/866345474722320388
या ट्वीटनंतर परेश रावल यांच्यावर टीका होऊ लागली. त्यांचं ट्वीट हिंसक असल्याचं काही युझर्सचं म्हणणं आहे. तर काहींनी रावल यांच्या बाजूने ट्वीट केलं आहे.

अरुंधती रॉय या प्रसिद्ध लेखिका आणि समाजसेविका आहेत, ज्या कायम काश्मिरींच्या बाजूने बोलताना दिसतात. नुकतंच अरुंधती रॉय म्हणाल्या होत्या की, "भारताने काश्मीरमध्ये 7 ते 70 लाख सैनिक जरी तैनात केले, तरी काश्मीरमध्ये आपलं लक्ष्य पार करु शकत नाही."

दरम्यान, लष्कराच्या एका अधिकाऱ्याने एप्रिलमध्ये काश्मिरी तरुण फारुक अहमद डारला जीपच्या बोनेटला बांधून त्याचा वापर मानवी ढाल म्हणून केला होता. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर मोठा वाद झाला होता. पण नंतर या अधिकाऱ्याला क्लीन चिट दिली होती.

परेश रावल हे भाजपचे खासदार असून त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं आहे.