Congress Supporters Fight Fact Check: देशात लोकसभा निवडणूक सुरु असून या दरम्यान अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या दरम्यान एक व्हिडीओ व्हायरल होत आहे त्यामध्ये दावा करण्यात आलाय की हरियाणाच्या सिरसामध्ये मत मागण्यासाठी पोहोचलेल्या भाजप नेत्याला जनतेनं मारहाण केली. मात्र, जेव्हा विश्वास न्यूजनं याची पडताळणी केली त्यावेळी हा दावा असत्य असल्याचं समोर आलं. या व्हिडीओत काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला असून तो भाजपशी जोडण्यात आला आहे.
फेसबुक वापरकर्ता विजय गुप्ता यानं 9 मे 2024 रोजी हा व्हिडीओ शेअर केला आहे. याच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलंय की, "सिरसामध्ये प्रसाद घेताना भाजप नेता, यावेळी संख्या नक्कीच 400 पार होईल." विजय गुप्ताची पोस्ट तुम्ही इथं क्लिक करुन पाहू शकता.
फॅक्ट चेकमध्ये काय समोर आलं?
कीवर्डसच्या मदतीनं जेव्हा गूगल सर्च करण्यात आलं त्यावेळी सिरसा समाचार नावाचं फेसबुक खातं मिळालं. त्यावर हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला होता. सिरसा समाचारच्या फेसबुक अकाऊंटवर हा व्हिडीओ 5 मे 2024 रोजी शेअर करण्यात आला होता.
व्हिडीओ कॅप्शनमध्ये लिहिलं होतं की, "सिरसा लोकसभा निवडणुकीत संभाव्य पराभवावरुन शैलजा आणि हुड्डा समर्थकांमध्ये मारपीट, काल भाजप उमेदवार अशोक तंवर यांचा उमेदवारी अर्ज भरताना जमलेल्या गर्दीनं स्पष्ट केलं की सिरसा लोकसभा निवडणुकीत भाजपचं पुढे राहील. यावरुनच काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मारामारी झाली. काँग्रेसमध्ये दोन गट आहेत. एक हुड्डा तर दुसरा काँग्रेस उमेदवार शैलजा यांचा होय. हुड्डा समर्थखांनी म्हटलं की शैलजा यांच्या समर्थकांनी त्यांना विनाकारण उसकावलं आणि मारहाण केली. यामागचं कारण एकदम स्पष्ट असून संभाव्य पराभवाचं खापर कुणाच्या तरी डोक्यावर फोडायचं असून शैलजा त्याच्या तयारीला लागल्या आहेत. कारण या प्रकरणावरुन सिद्ध झालं की हुड्डा समर्थक कोणत्याही कारणामुळं कुमारी शैलजा यांना ते मतदान करणार नाहीत. यामुळं आपापसात मारहाण करत आहेत. कारण जेव्हा निकाल येतील त्यावेळी हे सांगतील की निवडणूक त्यांच्यामुळं पराभूत झालो."
फॅक्ट चेकमध्ये हरियाणा टुडे न्यूज आणि अंबाला मिररच्या अधिकृत फेसबुक पेजवर हा व्हिडीओ मिळाला. हा व्हिडीओ दोन्ही ठिकाणी 5 मे 2024 रोजी अपलोड करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ सिरसामधील सैमाण गावातील आहे. या ठिकाणी काँग्रेसच्या दोन गटांमध्ये वाद झाला होता. एक गट काँग्रेस नेत्या शैलजा कुमारी यांचा तर दुसरा गट हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्या समर्थकांचा होता.
व्हिडीओतून निष्कर्ष काय निघाला?
दैनिक जागरण, फतेबादच्या जिल्हा प्रभारी अमित रुक्य यांच्याशी संपर्क केल्यानंतर समजलं की व्हिडीओसोबत करण्यात आलेला दावा पूर्णपणे चुकीचा आहे. व्हिडीओ सैमाण गावाशी संबंधित आहे. इथं काँग्रेसच्या दोन गटात मारामारी झाली झाली होती. ज्या यूजरनं हा व्हिडीओ चुकीच्या दाव्यासह प्रसिद्ध केला होता त्याच्या प्रोफाइलची माहिती घेतल्यास तो विशिष्ट विचारधारेचे व्हिडीओ शेअर करतो हे स्पष्ट झालं आहे. फॅक्टचेकमध्ये हे सप्षट झालं की काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वादाचा व्हिडीओ भाजपशी जोडून शेअर केला जात आहे.
Disclaimer: With inputs from Vishvas News as part of the Shakti Collective.