Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
मुख्यमंत्री विजय यांचे वडील एस. ए. चंद्रशेखर, आई शोभा आणि अभिनेत्री त्रिशा पहिल्या रांगेत उपस्थित होते

Vijay Thapathy Independence Day Speech: तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी चेन्नई येथे झालेल्या 80 व्या स्वातंत्र्यदिनाच्या ( Independence Day) सोहळ्यात झेंडा फडकवला. जात आणि धर्माच्या आधारावर उभ्या राहिलेल्या भिंती कोसळल्या पाहिजेत. सर्व नागरिकांनी भेदभाव बाजूला ठेवून एकत्र उभे राहिल्यासच खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याची अनुभूती मिळेल, भ्रष्टाचार आणि लाचखोरीपासून राज्याला मुक्त करणे म्हणजेच खरी स्वातंत्र्याची भावना असल्याचेही ते म्हणाले.मुख्यमंत्री म्हणून सी जोसेफ विजय ( C Vijay Joseph) यांचं हे पहिलंच भाषण होतं.
तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय सकाळी सुमारे 7.45वाजता नीलांकराई येथील त्यांच्या निवासस्थानातून रवाना झाले. त्यानंतर पोलिसांच्या मोटारसायकल ताफ्याच्या सुरक्षा व्यवस्थेत त्यांना फोर्ट सेंट जॉर्ज येथे आणण्यात आले. या कार्यक्रमाला मंत्री, राजकीय नेते, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री विजय यांचे वडील एस. ए. चंद्रशेखर, आई शोभा आणि अभिनेत्री त्रिशा पहिल्या रांगेत उपस्थित होते. पोलिसांच्या मानवंदनेनंतर विजय यांनी राष्ट्रीय ध्वज फडकावला आणि ध्वजाला सलामी दिली.
मुख्यमंत्री विजय यांचं भाषण..
कार्यक्रमाला संबोधित करताना मुख्यमंत्री विजय म्हणाले, “जेव्हा लोकांना जाणीव होते की आपल्याला गुलामगिरीत ठेवले जात आहे, तेव्हा त्यांच्यात एकतेची भावना निर्माण होते. ते एकत्रितपणे विचार करू लागतात आणि एकजूट होतात. या एकतेमुळे जात आणि धर्माच्या भिंती कोसळतात आणि भाषा- वंशाच्या आधारावर असलेले भेदही दूर होतात. हेच खरे स्वातंत्र्य आहे.”
ते पुढे म्हणाले, “तामिळनाडूला लाचखोरी आणि भ्रष्टाचारापासून वाचवणे हेदेखील स्वतःमध्ये एक मोठे स्वातंत्र्य आहे. या 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मला राष्ट्रीय ध्वज फडकावण्याची आणि या कार्यक्रमात बोलण्याची संधी दिल्याबद्दल माझ्या तामिळ बांधवांचे आणि तामिळनाडूतील जनतेचे मनःपूर्वक आभार मानतो.”
“सार्वजनिक आयुष्यात कोणतीही तडजोड करता येत नाही. जनतेची सेवा करणे हेच सर्वात महत्त्वाचे आहे. TVK सरकार याच उद्देशाने काम करत आहे. जनतेच्या कल्याणासाठी विविध योजना राबवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडून प्रशासकीय सहकार्य मिळावे, अशी आमची अपेक्षा आहे,” असेही विजय यांनी सांगितले. धोरणांच्या बाबतीत राज्याच्या हिताला बाधा आणणाऱ्या निर्णयांना TVK सरकारचा नेहमीच विरोध असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जनतेला आवाहन करताना मुख्यमंत्री विजय म्हणाले, “तुम्ही सर्वांनी तुमच्या मोठ्या भावाचा, धाकट्या भावाचा किंवा मुलाचा विजय व्हावा म्हणून मतदान केले आणि मला मुख्यमंत्री बनवले. मात्र, आता आपले कर्तव्य संपले असे समजून बाजूला होऊ नका. यापुढे तुम्ही सरकार आणि आमच्यासोबत ठामपणे उभे राहिले पाहिजे. चला, आपण सर्व मिळून आपली कर्तव्ये पार पाडूया.” असं तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय म्हणाले.






















