Prafulla Kar : गीतकार, गायक आणि संगीत दिग्दर्शक प्रफुल्ल कर (Prafulla Kar) यांचे रविवारी रात्री वयाच्या 83व्या वर्षी निधन झाले. कला क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रफुल्ल कर यांना 2015 मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 2004मध्ये त्यांना ‘जयदेव’ पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. 16 फेब्रुवारी 1939 रोजी पुरी येथे जन्मलेले प्रफुल्ल कर हे प्रसिद्ध संगीतकार, गायक, गीतकार, लेखक आणि स्तंभलेखक होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आणि म्हटले की, ‘ओडिया संस्कृती आणि संगीतातील त्यांच्या अग्रगण्य योगदानाबद्दल त्यांचे कायम स्मरण केले जाईल.’


पंतप्रधान मोदींनी ट्विट केले की, ‘श्री प्रफुल्ल करजींच्या निधनाने दु:ख झाले आहे. ओडिया संस्कृती आणि संगीतातील त्यांच्या अमुल्य योगदानासाठी त्यांचे कायम स्मरण केले जाईल. त्यांना एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व लाभले होते आणि त्यांची सर्जनशीलता त्यांच्या कार्यातून दिसून येते. ओम शांती.’



ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनीही त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आणि या घटनेने ओडिया संगीतातील एका युगाचा अंत झाल्याचे म्हटले.


ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी ट्विट केले की, ‘प्रसिद्ध संगीतकार प्रफुल्ल कर यांच्या निधनाची बातमी ऐकून मला दु:ख झाले. त्यांच्या निधनाने ओडिया संगीताच्या विश्वातील एका युगाचा अंत झाला. त्यांची अनोखी संगीत शैली त्यांना लोकांच्या हृदयात कायमचे अमर करेल.’


मृतांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. राज्य सरकारच्या दोन मंत्र्यांनी अंत्यसंस्काराला उपस्थित राहून, त्यांना श्रद्धांजली वाहण्याचे निर्देश पटनायक यांनी दिले आहेत.


हेही वाचा :