Vaalvi 2 Marathi Movie : मराठी मनोरंजनसृष्टीसाठी 2023 हे वर्ष खूपच खास आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुखच्या 'वेड'ने (Ved) आणि त्यापाठोपाठ 'वाळवी' (Vaalvi) या मराठी सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धमाका केला. सिनेमागृहांपासून दुरावलेल्या सिनेप्रेक्षकांना पुन्हा एकदा सिनेमागृहाकडे खेचून आणण्यात हे सिनेमे यशस्वी ठरले आहेत. 'वाळवी' सिनेमाला मिळालेल्या यशानंतर झी स्टुडिओजने या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची (Vaalvi 2) घोषणा केली आहे. 


'वाळवी' हा सिनेमा नेहमीच्या पठडीतला नसूनही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या सिनेमाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 'वेड' आणि नंतर 'पठाण' या सिनेमामुळे 'वाळवी'ला खूपच कमी शो मिळाले होते. पण माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी केली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी या सिनेमाचे शो वाढवण्यात आले आहेत. 


प्रेक्षकांना आता 'वाळवी 2'ची उत्सुकता


'वाळवी' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा परेश मोकाशीने सांभाळली आहे. नुकतचं परेश मोकाशीच्या वाढदिवसांचं औचित्य साधत सिनेमाचं यश साजरं करण्यासाठी एका खास पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. मराठी मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांच्या उपस्थितीत आणि 'वाळवी' सिनेमाच्या टीमसोबत परेश मोकाशीचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. 


झी स्टुडिओजने 'वाळवी 2'ची घोषणा केली आहे. त्यामुळे चाहते आता या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. परेश मोकाशी त्यांची पत्नी आणि लेखिका मधुगंधा कुलकर्णी आणि मंगेश धाकडे यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली आहे. सध्या मधुगंधा या सिनेमाच्या कथानकावर काम करत आहे. लवकरच पुढील भागासंदर्भातील अपडेट्स समोर येतील.  


'वाळवी' या सिनेमात स्वप्नील जोशी, अनिता दाते, सुबोध भावे आणि शिवानी सुर्वे मुख्य भूमिकेत होते. आता वाळवीच्या दुसऱ्या भागातदेखील हीच तगडी स्टार कास्ट असेल का याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. 'वाळवी' हा सिनेमा प्रेक्षकांना शेवटपर्यंत खुर्चीला खिळवून आहे. या सिनेमाचं मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांकडून कौतुक होत आहे. 


प्रेक्षकांचे प्रेम मिळवण्यात 'वाळवी' यशस्वी


13 जानेवारीला प्रदर्शित झालेल्या परेश मोकाशी दिग्दर्शित 'वाळवी' या सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. 'पठाण' सारखा बिग बजेट चित्रपट शर्यतीत असतानाही 'वाळवी' चित्रपटाने आपले स्थान कायम ठेवले आहे. यावरूनच मराठी प्रेक्षक 'वाळवी'ला पसंती देत आहेत हे सिद्ध झालं आहे. हिंदी सिनेमासमोर मराठी सिनेमा ताकदीने उभा आहे ही मनोरंजनसृष्टीसाठी आनंदाची बाब आहे.


संंबंधित बातम्या


Marathi Movies : मराठी सिनेसृष्टी पुन्हा बहरली! 'वेड' अन् 'वाळवी'वर उमटली प्रेक्षकांच्या पसंतीची मोहोर...