Ved Vaalvi Marathi Movie Box Office Collection : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathaan) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. पण दुसरीकडे रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया देशमुखचा (Genelia Deshmukh) 'वेड' हा सिनेमादेखील 'पठाण'च्या त्सुनामीत चाहत्यांना 'वेड' लावण्यात यशस्वी ठरला आहे.
'वेड' हा सिनेमा 30 डिसेंबर 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता सिनेमागृहात या सिनेमाचे 31 दिवस पूर्ण झाले आहे. आतापर्यंत या सिनेमाने 70.90 कोटींची कमाई केली आहे. हा सिनेमा 100 कोटींच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत हा सिनेमा नागराज मंजुळेच्या 'सैराट'ला मागे टाकू शकतो. रितेश देशमुखने खास पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत.
'वाळवी'ची हिंदी सिनेमावर मात
परेश मोकाशी दिग्दर्शित 'वाळवी' या सिनेमालादेखील प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. 'पठाण' सारखा बिग बजेट सिनेमा शर्यतीत असतानाही 'वाळवी' सिनेमाने तिसऱ्या आठवड्यातही आपले स्थान कायम ठेवले आहे. यावरूनच मराठी प्रेक्षक 'वाळवी'ला पसंती देत आहेत हे सिद्ध झालं आहे. या आठवड्यातही काही थिएटरमध्ये 'वाळवी'चे शोज तिप्पट पटीने वाढवण्यात आले आहेत.
कोरोनानंतर प्रेक्षकांच्या भेटीला आलेली फ्रेश जोडी आणि फ्रेश कथा सिनेरसिकांना पुन्हा एकदा सिनेमागृहाकडे वळवण्यात यशस्वी ठरली आहे. कोरोनामुळे सिनेप्रेमी ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमा पाहायला पसंती दर्शवत होते. पण कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर प्रेक्षकांची पाऊले सिनेमागृहाकडे वळवण्यात 'वेड' आणि 'वाळवी' या दोन्ही सिनेमांना यश आलं आहे.
'वेड' या सिनेमाचं बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी कौतुक केलं आहे. तर 'वाळवी' या सिनेमाचं मराठी सिनेसृष्टीतील अनेक मंडळींनी खास पोस्ट लिहित कौतुक केलं आहे. सध्याच्या घडीला मराठी सिनेसृष्टी समृद्ध करण्यात हे दोन्ही सिनेमे यशस्वी झाले आहेत. अनेक सिनेमागृहांनी या दोन्ही सिनेमाचे शोज वाढवले आहेत. त्यामुळे वर्षाच्या सुरुवातीलाच या दोन्ही सिनेमांनी मराठी सिनेसृष्टीला सुगीचे दिवस दाखवले आहेत. त्यामुळे हे वर्ष मराठी सिनेसृष्टीसाठी नक्कीच खास असणार आहे.
संबंधित बातम्या