Toxic OTT Release: यश-कियाराच्या ‘Toxic’ची OTTवर एन्ट्री! गँगस्टरचा खूंखार थरार घरबसल्या पाहता येणार; ‘या’ प्लॅटफॉर्मवर होणार स्ट्रीम
गीतू मोहनदास यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून यशसोबत कियारा अडवाणी, नयनतारा, तारा सुतारिया, हुमा कुरेशी आणि रुक्मिणी वसंत महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत.

Toxic OTT Release: टॉक्सिक हा सिनेमा (Toxic) 26 ऑगस्ट 2026 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. तब्बल चार वर्षांनंतर यशने मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. या सिनेमात यशचा गँगस्टरचा खतरनाक अंदाज प्रेक्षकांना थक्क करतोय. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली असून, आता प्रेक्षकांना हा सिनेमा घरबसल्या OTT वर पाहता येणार आहे. गीतू मोहनदास यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून यशसोबत कियारा अडवाणी, नयनतारा, तारा सुतारिया, हुमा कुरेशी आणि रुक्मिणी वसंत महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत.
‘टॉक्सिक’ कधी आणि कुठे पाहता येणार?
‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, ‘टॉक्सिक’ हा सिनेमा ZEE5 या OTT प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार आहे. ZEE5 हा या अॅक्शन-थ्रिलर सिनेमाचा अधिकृत स्ट्रीमिंग पार्टनर आहे. मात्र, सिनेमाच्या निर्मात्यांकडून किंवा OTT प्लॅटफॉर्मकडून अद्याप स्ट्रीमिंगची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. साधारणपणे चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर 6 ते 8 आठवड्यांनी सिनेमे OTTवर येतात. त्यामुळे ‘टॉक्सिक’ 7 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबरदरम्यान ZEE5 वर स्ट्रीम होण्याची शक्यता आहे.
काय आहे ‘टॉक्सिक’ची कथा?
‘टॉक्सिक’ची कथा राया नावाच्या गँगस्टरभोवती फिरते. यशने ही भूमिका साकारली आहे. कथा तब्बल चार दशकं मागे घेऊन जाते. रायाच्या बालपणीच्या कटू अनुभवांचा त्याच्या तरुण आयुष्यावर मोठा परिणाम झालेला असतो. स्वातंत्र्यानंतरच्या 1940च्या दशकात गोव्यावर राज्य करण्याचं एकमेव ध्येय रायाने उराशी बाळगलेलं असतं. यासाठी त्याची पोर्तुगीज माफियासोबत मजबूत युती असते. मात्र, नादिया म्हणजेच कियारा अडवाणीच्या व्यक्तिरेखेसोबत त्याचं नातं निर्माण झाल्यानंतर परिस्थिती बदलू लागते. नादिया ही एक रहस्यमय सर्कस कलाकार असते.एकीकडे स्वतःवर घेतलेली जबाबदारी आणि दुसरीकडे ‘टॉक्सिक’ ठरणारी प्रेमकहाणी, अशा कात्रीत राया सापडतो.त्यामुळे त्याला आपल्या आयुष्यातील दोन महत्त्वाच्या गोष्टींपैकी एका गोष्टीची निवड करावी लागते.
‘टॉक्सिक’ची बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात
‘टॉक्सिक’ने ग्लोबल बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग केली. सिनेमाला संमिश्र तसेच काही नकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या असल्या तरी त्याने सहज 100 कोटी रुपयांचा टप्पा पार केला. मात्र, यशच्या ‘K.G.F: Chapter 2’च्या ओपनिंगचा विक्रम ‘टॉक्सिक’ला मोडता आलेला नाही. ‘K.G.F 2’ हा यशच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी बॉक्स ऑफिस ओपनिंग करणारा सिनेमा ठरला आहे. तरीही ‘टॉक्सिक’ने रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ आणि शाहरुख खानच्या ‘जवान’सारख्या मोठ्या सिनेमांना मागे टाकल्याचं बोललं जात आहे.






















