Toxic Event Accident: अरेरेरेरे... यशच्या डोळ्यासमोर हादरवणारं घडलं, लगेच भाषण थांबवलं, ‘टॉक्सिक’च्या इव्हेंटमध्ये मोठा अपघात, VIDEO
स्टेजजवळ मोठ्या संख्येने विद्यार्थी पोहोचले होते आणि काही जण स्पीकर व इतर उपकरणांना आधार देणाऱ्या संरचनेवर चढल्याचंही समोर आलं आहे.

Toxic Event Accident: साऊथ सुपरस्टार यशच्या आगामी ‘टॉक्सिक’ (Toxic) या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. हा चित्रपट 26 ऑगस्टला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. मात्र, चित्रपटाच्या रिलीजपूर्वीच हैदराबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ग्रँड प्री-रिलीज इव्हेंटमध्ये मोठा अपघात झाला. या दुर्घटनेत दोन विद्यार्थी जखमी झाले, तर एक मुलगी बेशुद्ध पडल्याची माहिती समोर आली. परिस्थिती पाहून यशने आपलं भाषण मध्येच थांबवलं आणि जखमींची विचारपूस केली.
नेमकं काय घडलं?
शनिवारी (22 ऑगस्ट) हैदराबादमधील मल्ला रेड्डी युनिव्हर्सिटीमध्ये ‘टॉक्सिक’चा प्री-रिलीज इव्हेंट आयोजित करण्यात आला होता. यावेळी यशला पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. मात्र, या गर्दीदरम्यान कार्यक्रमस्थळी अचानक मोठा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, कार्यक्रमादरम्यान एक मोठा साउंड-बॉक्स सेटअप अचानक कोसळला. काही लोक साउंड बॉक्सला आधार देणाऱ्या खांबावर चढल्याने हा सेटअप खाली पडल्याचं सांगितलं जातंय. या दुर्घटनेत दोन विद्यार्थी जखमी झाले, तर एक मुलगी बेशुद्ध पडली.जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. विशेष म्हणजे, हा अपघात झाला त्यावेळी यश मंचावर उपस्थित होता आणि तो चाहत्यांशी संवाद साधत होता.
यशने मध्येच थांबवलं भाषण
अपघाताची माहिती मिळताच यशने आपलं भाषण थांबवलं. त्याने मंचावरून आयोजकांकडे जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली. तो म्हणाला, “अरे, सांभाळून. तिथे सगळं ठीक आहे ना? सर, कृपया तपासा. विद्यार्थ्यांनो, तुम्ही काळजी घ्या,” असं म्हणताना ऐकू येत आहे.या घटनेनंतर कार्यक्रमस्थळी काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.
इव्हेंटचा व्हिडीओ व्हायरल
‘टॉक्सिक’च्या प्री-रिलीज इव्हेंटमधील एक व्हिडीओही समोर आला आहे. यामध्ये कार्यक्रमासाठी जमलेली प्रचंड गर्दी दिसत आहे. काही लोक जखमी विद्यार्थ्यांना रुग्णवाहिकेकडे घेऊन जाताना दिसत आहेत. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं. या घटनेमुळे मोठ्या चित्रपटांच्या कार्यक्रमांमध्ये गर्दीचं व्यवस्थापन आणि सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. स्टेजजवळ मोठ्या संख्येने विद्यार्थी पोहोचले होते आणि काही जण स्पीकर व इतर उपकरणांना आधार देणाऱ्या संरचनेवर चढल्याचंही समोर आलं आहे.
#Yash was shocked, stopped his speech, and asked the security team to check on the situation after a minor accident occurred at the #TOXIC event.. pic.twitter.com/n43a6dKASs
— Laxmi Kanth (@iammoviebuff007) August 23, 2026
‘टॉक्सिक’मध्ये यशसोबत नयनतारा, कियारा अडवाणी, हुमा कुरेशी आणि तारा सुतारिया महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. गीतू मोहनदास यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ‘टॉक्सिक’ 26 ऑगस्टला सिनेमागृहात प्रदर्शित होणार असून चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.





















