Tiger Shroff Attack Case: ‘डेड लेटर बॉक्स’ने हत्यारे पाठवली, राधा-बबिताच्या हातावर अवघे 10-12 हजार टेकवले, टायगर श्रॉफच्या हल्ल्यामागील शस्त्रपुरवठ्याचा हादरवणारा घटनाक्रम
Tiger Shroff Attack Case: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात पोलीस चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. आता पोलीस चौकशीतून या प्रकरणात शस्त्रपुरवठ्याच्या सिंडिकेटचा खुलासा झाला आहे.

Tiger Shroff Attack Case: बॉलिवूड (Bollywood News) अभिनेता टायगर श्रॉफ (Actor Tiger Shroff) याच्यावरील गोळीबार प्रकरणात सध्या पोलीस चौकशी सुरू आहे. पोलीस चौकशीतून अत्यंत खळबळजनक खुलासे होत आहेत. आरोपींच्या टार्गेटवर टायगर श्रॉफ (Tiger Shroff) मुळी नव्हताच, असा धक्कादायक खुलासा या प्रकरणात झालाय. तसेच, टायगरला टार्गेट करण्याआधी आरोपींनी बॉलिवूडच्या तीन बड्या स्टार्सची रेकी केलेली. त्यामध्ये अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), आमीर खान (Aamir Khan) आणि अक्षय कुमार (Akshay Kumar) यांचा समावेश होता. पण, कडेकोट सुरक्षा असल्यामुळे आणि या स्टार्सच्या सुरक्षेचं जाळं भेदणं अशक्य असल्यामुळे आरोपींनी टायगरची निवड केली, असं तपासातून समोर आलंय. तसेच, आता या प्रकरणात आणखी एक खळबळजनक खुलासा झालाय. टायगरवरच्या हल्ल्यासाठी आरोपींनी शस्त्र पुरवण्यासाठी 'डेड लेटर बॉक्स' पद्धतीचा वापर केल्याचं समोर आलंय. आरोपींनी नेमकी शस्त्र कुठून आणि कशी मुंबईपर्यंत आणली? हेसुद्धा चौकशीतून उघड झालंय.
टायगरला टार्गेट करण्यासाठी आरोपींनी शस्त्र कुठून आणि कशी मुंबईपर्यंत आणली?
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात पोलीस चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. आता पोलीस चौकशीतून या प्रकरणात शस्त्रपुरवठ्याच्या सिंडिकेटचा खुलासा झाला आहे. प्रकरणातील आरोपींना 'डेड लेटर बॉक्स' पद्धतीनं शस्त्रांचा पुरवठा करण्यात आल्याचं समोर आलंय.
टायगर श्रॉफवरील गोळीबार प्रकरणात आरोपींना पिस्तूल कुठून आणि कसे मिळाले? याचा खळबळजनक खुलासा पोलीस चौकशीत झालाय. एका अज्ञात व्यक्तीनं अमृतसरमध्ये शस्त्र ठेवलेली. अनिल पंडितनं ही शस्त्र ठेवलेलं लोकेशन कुणाल आणि सुमितला पाठवलं होतं. दोन आठवड्यांपूर्वी कुणाल आणि सुमित यांनी अमृतसरला जाऊन शस्त्र ताब्यात घेतली. त्यानंतर ती शस्त्र मुंबईला पोहोचवण्यासाठी दोन तरुणींची मदत घेतली. शस्त्रं मुंबईत पोहोचवण्यासाठी राधा आणि बबिताचा वापर केला. त्यांना दिल्लीहून मुंबईला ट्रेननं पाठवलं आणि राधाच्या बॅगमध्ये पिस्तूल ठेवलं.
टायगरवरच्या हल्ल्याचा कट कसा रचला गेला?
पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी कुणाल नुकताच जामिनावर जेलमधून बाहेर आला होता. हरसाना गावातील एका मित्रामार्फत कुणालची अनिल पंडितशी ओळख झाली. त्यानंतर एन्क्रिप्टेड ॲपवरून कुणाल आणि अनिल पंडित यांच्यात संपर्क सुरू होता. अनिल पंडितच्या सांगण्यावरून कुणालनं अमृतसरमधून 1 पिस्तूल आणि 20 राऊंड घेतले. सुमित कुणालसोबत अमृतसरला गेलेला. सुमारे 2 महिन्यांपूर्वी कुणालची राधाशी ओळख झाली होती. कुणालनं राधाला आपल्या कारवायांची माहिती देत, तिच्याशी संबंध निर्माण केलेले. त्यानंतर कुणाल यानं राधाला शस्त्र घेऊन मुंबईला जाण्यास तयार केलं. 15 ऑक्टोबरला कुणाल राधा आणि बाबिताला नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर घेऊन गेला. पिस्तूल राधाच्या बॅगेत ठेवण्यात आलेलं. प्रवासादरम्यान कुणाल एन्क्रिप्टेड ॲपवरून अनिल पंडितच्या सूचनांनुसार संपर्कात होता.
पोलीस चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार, टायगर श्रॉफवरील गोळीबारात वापरण्यात आलेल्या शस्त्रांची वाहतूक करण्यासाठी अनिल पंडितकडून 70 ते 80 हजार रुपये दिल्याचा खुलासाही चौकशीत झालाय. यातले 10 ते 12 हजार रुपये राधा आणि बबिताला दिल्याचा संशय पोलिसांना आहे.
नेमकं काय घडलं?
बॉलिवूडचा प्रसिद्ध स्टारकीड, अभिनेता टायगर श्रॉफवर 18 ऑक्टोबर रोजी एका पार्कच्या बाहेर बेछुट गोळीबार करण्यात आला. दोघांनी टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार केला, ज्यात टायगर श्रॉफ सुदैवानं बचावला. या प्रकरणात तत्परतेनं कारवाई करत पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. टायगर श्रॉफवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर बॉलिवूड कलाकार पुरते धास्तावले आहेत. अभिनेत्याचे मित्र आणि चाहते त्याच्या सुरक्षिततेबद्दल अत्यंत चिंतेत आहेत. दरम्यान, या हल्ल्याचा टायगर श्रॉफचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतोय. ज्यातून टायगर श्रॉफवर झालेला हल्ल्या किती भीषण होता, हे समोर आलंय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :





















