मुंबई : 'गॅरी', 'शनाया'... म्हणजेच 'शन्या', 'राधिका' अशी ही पात्र काही वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आली. निमित्त होतं ते म्हणजे 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेचं. जवळपास चार वर्षांहून अधिक काळापासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आली आहे. टीआरपीच्या शर्यतीतही बाजी मारणाऱ्या या मालिकेला आणि मालिकेतील कलाकाराला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. पण, सुरु झालेला हा प्रत्येक प्रवास हा एका वळणावर येऊन संपतोच, याच नियमाप्रमाणं आता या मालिकेनंही प्रेक्षकांपासून दुरावा घेण्याची वेळ आली आहे.


कोणत्याही कलाकारासाठी त्यांची मालिका, भूमिका आणि तिथं व्यतीत केलेला काळ हे सारंकारी अनन्यसाधारण महत्त्वाचं असतं. या मालिकेतील कलाकारांसोबतही असंच काहीसं झालं आहे. कमालीच्या लोकप्रियतेनंतर आता अखेर मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असताना यामध्ये 'राधिका सुभेदार' ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अनिता दाते- केळकर हिनं एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.


'मी या घरची राणी माझ्या राजाला शोभते.... आमचं टायटल सॉंग आज शेवटचं टीव्हीवर एपिसोड च्या सुरुवातीला लागलं.२२ ऑगस्ट २०१६ ला सुरू झालेला हा माझ्या नवऱ्याची बायको चा प्रवास आज संपतोय. सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभार. साडेचार वर्षांत तुम्ही प्रेक्षकांनी आमच्यावर भरभरून प्रेम केलं.. कौतुक केलंत म्हणून हे शक्य झालं. या दिवसांनी कलाकार म्हणून मला खूप काही दिलं. नाव मिळालं...राधिका म्हणून ओळख मिळाली.. अभिनेत्री म्हणून खूप काही शिकायला मिळालं..अनेक अनुभवांनी समृद्ध केलं.. जीवाभावाचे मित्र-मैत्रिणी मिळाले - समजून घेणारे, चुकलो तर चूक दाखवून देणारे, कौतुक करणारे आणि शिव्या घालणारे. हे सगळं मी मिळवलं आहे. हे माझ्याकडे कायम असणार आहे', असं तिनं या पोस्टमध्ये लिहिलं. यापुढं राधिका साकारण्याची संधी मिळणार नाही, याची हुरहुरही तिच्या या पोस्टमध्ये पाहायला मिळली.






तिथं गॅरी अर्थात गुरुनाथ सुभेदार साकारणाऱ्या अभिजीत खांडकेकरच्या ऑनस्क्रीन पत्नीनं भावनिक पोस्ट लिहिलेली असतानाच इथं गॅरीची खऱ्या आयुष्यातील पत्नी, सुखदा हिनंही एक पोस्ट लिहित या मालिकेतील भूमिकेसाठी अभिजीतचं अभिनंदन केलं. मी तुझा आणखी जास्त आदर करु लागले आहे, असं म्हणत सुखदानं मालिकेप्रती अभिजीतच्या समर्पकतेला दाद दिली. सोबतच एक फोटोही जोडला. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनीही प्रतिक्रिया देत अभिजीतनं साकारलेल्या भूमिकेबाबत त्याचं कौतुक केलं.