मुंबई : रंगदेवता व नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करत 'एका लग्नाची पुढची गोष्ट' नाटकाचा प्रवास 400 व्या प्रयोगावर येऊन ठेपला आहे. या नाटकात ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले मुख्य भूमिकेत आहेत. तर या नाटकात कविता मेढेकर, अतुल तोडणकर, मृणाल चेंबुरकर, प्रतिक्षा शिवणकर, राजसिंह देशमुख, पराग डांगे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. अद्वैत दादरकरने या नाटकाचे लेखन, दिग्दर्शन केले आहे. 400 वा प्रयोग विशेष पाहुण्यांच्या उपस्थितीत 14 मार्चला संध्याकाळी 5:30 वाजता पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात रंगणार आहे.
प्रशांत दामले आणि 'हाऊसफुलचा बोर्ड' हे समीकरण ठरलेले आहे. कधी नाटक सुरू होण्याआधीच प्रेक्षागृहात जाऊन प्रेक्षकांसोबत गप्पा मारणे, कधी नाटकादरम्यान फोनचा आवाज येऊ नये म्हणून जाहीर निवेदन करणे. तर कधी पडद्यामागच्या कलाकारांना आर्थिक मदत करणारे, नाटक सुरू असतानाच परिस्थितीचा अंदाज घेत उत्स्फुर्त विनोद करणारे विनोदाचे बादशाहा असे हे दामले. प्रशांत दामले या माणसाची जादू प्रेक्षकांना आपलीशी करते.
लॉकडाऊन नंतर प्रयोग होतील की नाही, रंगभूमी बंद पडते की काय असे वाटत असतानाच 5 नोव्हेंबरला शासनाने प्रयोग करायला मान्यता दिली. लॉकडाऊन नंतरचा या नाटकाचा पहिला प्रयोग 50 टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत, प्रेक्षकांच्या तुफान प्रतिसादात पार पडला. लॉकडाऊन नंतर येणारा प्रेक्षकवर्ग हा काहीवेळासाठी निगेटिव्ह वातावरणातून बाहेर पडून पॉझिटिव्ह होण्यासाठी, खदखदून हसण्यासाठी येत असतो. पन्नास टक्के प्रेक्षक आणि शंभर टक्के प्रतिसादात सध्या या नाटकाची यशस्वी घोडदौड सुरू आहे.
प्रशांत दामलेंच्या 'एका लग्नाची पुढची गोष्ट'ची यशस्वी घोडदौड. 14 मार्चला 400 वा विशेष प्रयोग.