मुंबई : नाट्यगृहांमध्ये आता मोबाईल जॅमर बसवण्याचा निर्णय मुंबई पालिका प्रशासनाने घेतला आहे. काही महिन्यांपूर्वी शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे जॅमर बसवण्याची मागणी केली होती. त्यामुळे पालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या नाट्यगृहांमध्ये आता लवकरच मोबाईल जॅमर बसवला जाण्याची शक्यता आहे.
नाट्यगृहात प्रयोग करत असताना कलाकारांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. कधी नाट्यगृहात स्वच्छता नसते तर कधी एसीच काम करत नाही. गेल्या काही वर्षांपासून तर प्रेक्षकांचा मोबाईल हा कलाकारांसाठी डोकेदुखी झाला आहे. अनेकवेळा प्रयोग सुरु असताना मोबाईल वाजतो, प्रेक्षक आपण नाट्यगृहात आहोत याची पर्वा न करता मोबाईलवर खुशालपणे बोलतात. या सगळ्यामुळे कलाकारांचे लक्ष विचलित होते.

यावर काही मराठी अभिनेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुबोध भावे -
अभिनेते सुबोध भावे यांनी या निर्णयाचं स्वागत केले आहे. लोकांनी वेळीच काळजी घेतली असती, तर ही सक्ती करण्याची वेळ आली नसती. कारण, कोणत्याही गोष्टीची सक्ती करणे चांगले नाही. लोकांनी ही शिस्त स्वयंस्फुर्तीने पाळायला हवी. अजूनही वेळ गेलेली नाही, प्रक्षेकांनी नाट्यगृहात मोबाईल सायलेंटवर ठेवले तर ही अट मागे घेण्यात येईल.



सुमित राघवन -
"आम्हाला होणाऱ्या त्रासाची प्रशासनाने दखल घेतल्याचा आनंद आहे. त्यामुळे मी या निर्णयाचे स्वागत करतो". कितीदा सुचना देऊनही काही प्रक्षेक तसेच वागतात. त्यामुळे शिस्त लागण्यासाठी हा निर्णय योग्य आहे".

चालू नाटक मध्येच केलं बंद -
नाटक सुरु असताना प्रेक्षकांचे मोबाईल वाजणं ही बाब नवी राहिलेली नाही. अभिनेता सुमित राघवन नॉक नॉक सेलिब्रेटी या नाटकाच्या नाशिकमधील प्रयोगाच्यावेळी प्रेक्षकांचे मोबाईल सतत वाजत असल्याने तो कंटाळला होता आणि चिडून त्याने नाटक बंद केले होते. तर, अभिनेता सुबोध भावेनेही नाटकाच्या प्रयोगादरम्यान वाजणाऱ्या मोबाईलबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. इतकंच नाही तर मोबाईल प्रयोगादरम्यान असेच वाजणार असतील तर आपण नाटकात काम करणं बंद करु असंही सुबोध भावेने म्हटलं होतं.

हेही वाचा - 

डोंबिवलीत 'मिशन मंगल'चा शो सुरु असताना चित्रपटगृहाचं सिलिंग कोसळलं, महिला आणि लहान मुलगी जखमी

नाट्यगृहाबाहेर सुबोध भावे डोअरकिपिंगचं काम करणार, प्रेक्षकांचे मोबाईल सायलेंटवर आहेत की नाही? ते स्वतः तपासणार

नाशिक | कालिदास नाट्यगृहाच्या दरात चार पटीने वाढ