मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांची निवड करण्यात आली आहे. परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी ही घोषणा केली. नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदासाठी डॉ. जब्बार पटेल आणि प्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी या दोघांनी अर्ज केले होते. यामध्ये पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.


अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या कार्यकारी समितीची बैठकीत अध्यक्षपदाची चर्चा झाली. या बैठकीत डॉ. जब्बार पटेल यांची एकमताने निवड करण्यात आली. 15 डिसेंबर रोजी होणाऱ्या नियामक मंडळाच्या बैठकीच पटेल यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.

जब्बार पटेल यांना वयाच्या दहाव्या वर्षी शाळेत असताना त्यांना नाटकांत काम करण्याची आणि नाट्यदिग्दर्शनाचीही संधी मिळाली. पुण्यातील बी. जे. महाविद्यालयातून त्यांनी आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. डॉ. जब्बार पटेलांनी अनेक नाटके व चित्रपट दिग्दर्शित केले. राजकीय सारीपाटावरचे शह-काटशह मांडणारे ' सामना, सिंहासन, गो. नी. दांडेकरांच्या कादंबरीवर आधारीत 'जैत रे जैत, मुक्ता, पु ल. देशपांडेनी लिहिलेला ' एक होता विदूषक' असे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. डॉ. जब्बार पटेलांनी थिएटर अकॅडमी या प्रायोगिक नाटकांसाठीच्या नाट्यसंस्थेची स्‍थापना केली आहे.

जब्बार पटेल यांना 2014 साली अखिल महाराष्ट्र नाट्यविद्यामंदिर समितीतर्फे विष्णुदास भावे गौरव पदकाने सन्मानित करण्यात आले. तसेच दिल्लीच्या संगीत नाट अकादमी आणि पुणे विद्यापीठाच्या जीवनसाधना गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

जब्बार पटेल यांची भूमिका असलेली नाटके
तुझे आहे तुजपाशी
माणूस नावाचे बेट
वेड्याचे घर उन्हात

जब्बार पटेलांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट
उंबरठा
एक होता विदूषक
जैत रे जैत
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
पथिक
मुक्ता
मुसाफिर
सामना
सिंहासन

जब्बार पटेलांनी दिग्दर्शित केलेले लघुपट
इंडियन थिएटर
कुसुमाग्रज
मी एस.एम.
लक्ष्मणराव जोशी