डोंबिवली : डोंबिवलीच्या मधुबन चित्रपटगृहात चित्रपट सुरू असताना सिलिंग कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत एक महिला आणि एक लहान मुलगी जखमी झाली आहे.
मधुबन चित्रपटगृहात रविवारी संध्याकाळी मिशन मंगल चित्रपटाचा खेळ सुरू होता. चित्रपट संपायला आला असताना अचानक चित्रपटगृहाचं पीओपी सिलिंग प्रेक्षकांवर कोसळलं. यात नंदिनी गणपुले आणि हिमानी झोपे या दोघी जखमी झाल्या आहेत.
चित्रपटगृह प्रशासनाने जखमींना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं. नंदिनी यांच्या डोक्याला आणि हिमानी हिच्या डाव्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे.
या चित्रपटगृहाची दुरुस्ती करणं गरजेचं असतानाही याठिकाणी चित्रपट सुरू असल्याची प्रेक्षकांची तक्रार आहे, तर आता चित्रपटगृहाची तातडीनं दुरुस्ती करणार असल्याचं चित्रपटगृह प्रशासनाने सांगितलं आहे.