मुंबई : कोणत्याही विश्वस्त मंडळाच्या कामाची कार्यपद्धती ठरलेली असते. निवडून आलेल्या सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन काम होणं अशी अपेक्षा असते. अखिल भारतीय नाट्यपरिषदही याला अपवाद नाही. पण अडीच वर्षात सत्ताधारी प्रसाद कांबळी यांनी नियामक मंडळाला विश्वासात न घेता चालवलेल्या मनमानी कारभाराबाबत मात्र निवडून आलेल्या सदस्यांनीच मौन सोडत घरचा आहेर दिला आहे.
लॉकडाऊनच्या काळात अनेकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. मनोरंजनसृष्टीही याला अपवाद नव्हती. त्यातही नाटक, रंगमंच कामगार, कलाकार आदी मंडळी यातून सुटली नाहीत. अर्थात त्यांना उभं करण्यासाठी अनेकांनी मदतीचे हात पुढे केले. नाट्यसृष्टीची मातृसंस्था म्हणवणाऱ्या अखिल भारतीय नाट्यपरिषदेनेही मदत करायचं ठरवलं. त्यासाठी 50 लाखांचा निधी उपलब्ध करून दिला. शिवाय, इतरांना मदतीचं आवाहनही केलं. अशातून 1 कोटी 20 लाख रुपये जमले. या मदतीचं वाटपही करण्यात आलं. पण हे वाटप देशभरातल्या वेगवेगळ्या शाखांतून निवडून आलेल्या नियामक मंडळातल्या सदस्य़ांना डावलून झाल्यानं या मंडळातल्या 60 पैकी 15 लोकांनी नाराजी नोंदवली आहे. त्यासंदर्भातला एक लेखी ईमेल या मंडळींनी तयार करून तो परिषदेचे विश्वस्त शरद पवार, शशी प्रभू, रवी बापट यांना पाठवला आहे.
हा ईमेल एबीपी माझाच्या हाती लागला असून यात 15 नियामक मंडळातल्या सदस्यांची नावं आहेत. सुशांत शेलार, भाऊसाहेब भोईर, मुकुंद पटवर्धन, योगेश सोमण, वीणा लोकूर, दिलीप गुजर, सविता मालपेकर, सुनील महाजन, दिलीप कोरके आदी सदस्यांची नावं आहेत. यापैकी कोणीही सदस्य यावर बोलायला तयार नाही. पण माझाला मिळालेल्या त्या ईमेलमध्ये प्रसाद कांबळी आणि त्यांच्या कार्यकारिणीने राबवलेल्या पद्धतीवर आक्षेप नोदवण्यात आले आहेत. अर्थात ही तक्रार व्यक्तिगत कोणावरही नाही. कोणातही मोठी निर्णय घेताना नियामक मडळातल्या मुंबई बाहेरच्या सदस्याना विश्वासात घेतलं जात नाही, शिवाय त्याची कोणतीही कल्पना दिली जात नाही असं या ईमेलमध्ये म्हटलं आहे. या ईमेलमध्ये गेल्या अडीच वर्षातल्या कारभारावर ताशेरे ओढण्यात आले आहेत. नाराजी नोंदवण्यात आली आहे. ही बाब वारंवार नाट्यपरिषद कार्यवाह, परिषद प्रवक्ता आदींच्या कानावर घालण्यात आल्याचंही नमूद करण्यात आलं आहे. पण तरीही हा कारभार चालू असल्याने अखेर या सदस्यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष, नाट्यपरिषदेचे विश्वस्त शरद पवार यांचा दरवाजा ठोठावला आहे.
लॉकडाऊन काळात गरजू कलावंतांना मदतीसाठी परिषदेनं आवाहन केल्यावर 1 कोटी 20 लाख रूपये जमले. त्याचं वितरणही परिषदेनं संबंधित गरजूंच्या अकाऊंटवर पैसै जमा करून केलं. परंतु ही मंडळी कोण होती. कुणाला पैसे दिले याची कोणतीही कल्पना नियामक मंडळातल्या सदस्यांना देण्यात आली नाही. निर्णय घेतल्यानंतर माहीती म्हणूनही याचे मेसेज कुणाला केले गेले नाहीत, असा आक्षेप नाव न सांगण्याच्या अटीवर एका सदस्याने केला. केवळ हा लॉकडाऊनच नव्हे, तर गेल्या वर्षी सांगली पूरग्रस्तांना परिषदेने मदत केली त्याची कल्पनाही नियामक मंडळाला दिली गेली नाही असं या ईमेलमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
प्रसाद कांबळी काय म्हणतात..
नियामक मंडळातल्या काही लोकांनी विश्वस्तांकडे केलेल्या तक्रारीच्या ईमेलबद्दल परिषदेचे प्रवक्ता मंगेश कदम यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते चित्रिकरणात व्यग्र होते. त्यानंतर नाट्यपरिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्याशी संपर्क साधला असता, या इमेलबद्दल आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचं सांगितलं.
राष्ट्रवादीचा 40 लाखांचा निधी दिला कुणाला?
रा्ष्ट्रवादी कॉंग्रेसने नाट्यसृष्टीसाठी 40 लाखांची मदत केली. परिषदेकडून गरजू लोकांची यादी घेऊन पक्षाने थेट अडीच हजार रूपये प्रत्येकी प्रत्येकाच्या अकाऊंटवर जमा केले. याचा आदर आहेच. पण राष्ट्रवादी पक्षाला नेमके कुणाचे अकाऊंट नंबर दिले गेले. त्या यादीत नेमकी कोण मंडळी होती, याची कोणतीही माहिती परिषदेच्या या सर्वौच्च मंडळाला नाही असंही कळतं.
निर्माता संघातही फूट
निर्मात्याच्या आजारपणात किंवा रंगमंच कामगारांसाठी गरज म्हणून असलेले राखीव 14 लाख रुपये 28 निर्मात्यांना वाटण्याच्या मुद्द्यावरून निर्माता संघात फूट पडली आहे. ही रक्कम गरजवंताऐवजी निर्मात्यालाच दिली जाणं चूक असल्याचं लक्षात आल्यानंतर निर्माता संघाचे अध्यक्ष अजित भुरे यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्यासोबत सुनील बर्वे, प्रशांत दामले, विजय केंकरे आदी मंडळींनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तीन महिने नाटकं बंद असल्याने निर्मात्यांना ही रक्कम द्यावी असा आग्रह निर्माता राहुल भंडारे यांचा होता. त्यावरून वाद होऊन ही फूट पडली आहे.
मदतीसाठीचे 1 कोटी 20 लाख दिले कुणाला? नियामक मंडळाच्या सदस्यांचा नाट्यपरिषदेला घरचा आहेर
सौमित्र पोटे, एबीपी माझा
Updated at:
11 Jul 2020 01:10 PM (IST)
नाट्यसृष्टीची मातृसंस्था म्हणवणाऱ्या अखिल भारतीय नाट्यपरिषदेनेही मदतीचं आवाहन करत 1 कोटी 20 लाख रुपयांचा निधी जमवला. या मदतीचं वाटपही करण्यात आलं. पण हे वाटप देशभरातल्या वेगवेगळ्या शाखांतून निवडून आलेल्या नियामक मंडळातल्या सदस्य़ांना डावलून झाल्यानं या मंडळातल्या 60 पैकी 15 लोकांनी नाराजी नोंदवली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -