Kalgitura Play At Bharangam International Festival : मुंबईतील (Mumbai News) नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट (National Centre for Performing Arts) (एनसीपीए) निर्मित , दत्ता पाटील लिखित आणि सचिन शिंदे दिग्दर्शित 'कलगीतुरा' या संगीतमय नाटकाची नवी दिल्लीतील एनएसडी अर्थात राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील 24 व्या भारतीय रंग महोत्सवात निवड झाली आहे. नवी दिल्लीत दरवर्षी होणारा वंदे भारंगम हा रंगभूमीसाठी मानाचा महोत्सव समजला जातो. हंडाभर चांदण्या, तो राजहंस एक या नंतर या जोडीचं सलग तिसरं नाटक भारंगमसाठी निवडलं गेलं हे कौतुकास्पद आहे.
दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी नवी दिल्लीतील श्रीराम सेंटर येथे सायंकाळी 5 वाजता कलगीतुरा नाटक सादर होईल. अनेक पुरस्कारांनी नावाजलेलं हे नाटक नवी दिल्लीत नुकत्याच झालेल्या मानाच्या इंडियन हॅबीटंट सेंटरच्या राष्ट्रीय महोत्सवात सादर झाले होते. नाशिक जिल्ह्यातील उमराणे (ता.देवळा) येथील कलगीतुरा परंपरेच्या पुनरूज्जीवनाच्या प्रयत्नांचा, कारणांचा आणि या लोकपरंपरेचा अभ्यास करून दत्ता पाटील यांनी ही संहिता लिहिली आहे. तब्बल 22 कलावंतांचा समावेश असलेले हे लोकसंगीतमय समकालिन भाष्य करणारे नाटक सचिन शिंदे यांनी दिग्दर्शित केलं आहे. एनसीपीएच्या 'दर्पण' लेखन उपक्रमात विजेत्या ठरलेल्या या नाटकाची एनसीपीएचे प्रमुख ब्रुस गुथरी आणि मराठी नाटक विभागाच्या व्यवस्थापक राजश्री शिंदे यांनी निर्मिती केली आहे. कलगीतुरा हा महाराष्ट्रातीलविविध प्रांतांच्या बोलीभाषांमधून, लहेजातून लिहिलेल्या शाहिरीलावण्यांचा, विशेषतः आध्यात्मिक लावण्यांचा प्रकार आहे. गावागावांतूनबहुजन शेतकरी बांधव कलगीतुऱ्याच्या माध्यमातून या लावण्या सादर करीत. काही कूटप्रश्न या लावण्यांमधून एकमेकांना विचारत. त्यातून उत्तरं मिळवत. ही परंपरा कालांतरानं लोप पावली. परंतु दोन दशकांनंतर नव्या पिढीतील काही ग्रामस्थांनी ही परंपरा शोधून पुन्हा प्रवाही केली. परंपरेच्या, जगण्याच्या हरवलेल्या लयीच्या या पुनरूत्थानाची ही कथा म्हणजे 'कलगीतुरा'.
गढीवरच्या पोरी, हंडाभर चांदण्या, तो राजहंस एक, दगड आणि माती यासारखी एकाहून एक सरस नाटके मराठी प्रायोगिक रंगभूमीला देणाऱ्या दत्ता पाटील आणि सचिन शिंदे यांच्या यशस्वी जोडीचे 'कलगीतुरा' हे नवी दिल्लीतील भारंगम आंतरराष्ट्रीय महोत्सवात निवडले जाणारे हे तिसरे नाटक आहे. एनसीपीएचे संचालक ब्रुस गुथ्री आणि मराठी नाट्यविभाग प्रमुख राजेश्री शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एनसीपीएने कलगीतुरा या मराठी नाटकाची निर्मिती केली आहे. या नाटकात हेमंत महाजन, विक्रम ननावरे, निलेश सूर्यवंशी, राम वाणी, अरूण इंगळे, ऋषिकेश शेलार, राजेंद्र उगले, कृष्णा शिरसाठ, प्रवीण जाधव, शुभम लांडगे, किरण राव, श्रृती कापसे, कविता देसाई, ऋषिकेश गांगुर्डे या नाशिक जिल्ह्यातील विविध भागातील कलावंतांच्या भूमिका आहेत. ऋषिकेश शेलार यांचे संगीत असून रोहित सरोदे संगीत संयोजक आहेत. प्रणव सपकाळे यांची प्रकाशयोजना असून चेतन बर्वे आणि लक्ष्मण कोकणे यांचे नेपथ्य आहे.