मुंबई : टीव्ही इंडस्ट्रीत कार्यरत असलेलं जे कलाकारविश्व आहे त्यात आस्ताद काळेचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं. मूळचा पुण्याचा असलेला आस्ताद आपल्या सोशल मीडियावरुन अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सातत्याने बोलत असतो. आपली मतं मांडत असतो. आता त्याने सोशल मीडिया अकाऊंटवरुन 'चला प्रश्न विचारुया' असा हॅशटॅग वापरुन मनातले काही प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. त्याने विचारलेल्या प्रश्नांना त्याचे फॉलोअर्स दादही देत आहेत. शिवाय त्यावर कमेंटही करत आहेत. आस्तादने विचारलेल्या नगरसेवकांबद्दलच्या प्रश्नाने मात्र सध्या चर्चेची धूळ उडवली आहे. 


'चला प्रश्न विचारुया' या अंतर्गत आस्तादने नगरसेवकांच्या पगाराचा मुद्दा उपस्थित केला आहे. नगरसेवकांना जर 25 हजार पगार असेल तर त्यांच्या दारात लक्झुरिअस गाडी कशी उभी असते? ज्या गाडीचा हफ्ता किमान 30 हजार असतो अशी गाडी त्यांना कशी परवडते असा मुद्दा उपस्थित केला आहे. ए ग्रेड पालिका म्हणजे, मुंबई पुणे आणि नागपूरमधल्या नगरसेवकांना हे कसं परवडतं असा सवाल त्याने उपस्थित केला आहे. यापूर्वी नगरसेवकांना साहेब का म्हणायचं अशा अर्थाची पोस्टही त्याने केली होती. या जुन्या पोस्टमध्ये तो म्हणतो, नगरसेवक हे आपले सेवक असतात. आपण त्यांना निवडून देतो. मग त्यांना साहेब, सर का म्हणायचं? त्यांना साहेब, सर म्हणणं बंद करुया असं आवाहनही तो करतो. 






आस्तादच्या या संबंधिच्या पोस्टवर अनेक लोक हिरीरीने व्यक्त झाले आहेत. त्यांना साहेब, सर म्हणणं तातडीने बंद करायला हवं असं यातल्या अनेक पोस्टमध्ये म्हटलं आहे. नगरसेवकांच्या पोस्टपासून सुरु झालेला हा सिलसिला इतर अनेक मुद्यांवर आला आहे. अलिकडे केलेल्या पोस्टमध्ये आस्तादने व्यवस्थेला चपराक लगावली आहे. तो या पोस्टमध्ये म्हणतो, "आपल्या देशाचं क्षेत्रफळ आणि या देशातली लोकसंख्या ही नेत्यांना रोज नव्याने कळत असावी. कारण, असुविधेबाबत नेहमी लोकसंख्येची कारणं दिली जातात." त्याच्या या आशयाच्या पोस्टलाही नेटकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. 


एकूणात 'चला प्रश्न विचारुया' ही आस्तादची मोहीम व्हायरल होते आहे हे खरं.