काहे दिया परदेससारख्या मालिकेतून लोकांसमोर आलेला अभिनेता समीर खांडेकर याने आज सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. समीर खांडेकरने सध्या तो राहात असलेल्या इमारतीच्या बिल्डरची अरेरावी लोकांसमोर आणली आहे. आपल्या मनात असलेल्या संतापाला वाट करून देण्यासाठी आपण हा व्हिडिओ करत असल्याचं समीर सांगतो. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. 


शुक्रवारी, सायंकाळी साडेसहा वाजता समीर खांडेकरने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत तो म्हणतो, बोरिवली पूर्वेत असलेल्या वृंदावन सोसायटीत मी राहातो. खरंतर बिल्डरने आम्हाला हे घर 2017 मध्ये देणं अपेक्षित होतं. पण आम्हाला ते 2020 मध्ये मिळालं. तीन वर्षे झगडून भाड्याच्या घरात राहून आम्ही आमचं घर मिळवलं. त्यानंतर झालं गेलं विसरून इथं राहावं असं आम्ही ठरवलं. मी, माझी, पत्नी, वडील सगळ्यांनी कष्टातून उभ्या केलेल्या पैशातून या इमारतीत आम्ही फ्लॅट घेतला. अनेकांना माझं घर आवडलं. आम्ही ते सजवलंही प्रेमानं आहे. पण गेल्या महिन्याभरापासून एक नवी समस्या समोर उभी राहिली आहे. आमच्या इमारतीत पाणीच येत नाहीय. काही दिवसांपूर्वी पालिकेचे लोक आले आणि त्यांनी पाण्याची असलेली आमच्या इमारतीची लाईनच काढली. आम्ही त्यांना असं का करताय असं विचारलं. त्यानंतर त्यांनी जे उत्तर दिलं ते ऐकून आम्ही चक्रावलो. पालिकेच्या म्हणण्यानुसार आमच्या बिल्डरने आमच्या इमारतीसाठी देऊ केलेलं पाणी कुठून तरी चोरलं होतं. हा प्रकार आम्हाला नवाच होता. ती अधिकृत पाण्याची लाईन नव्हती.'


 






समीर खांडेकरने अत्यंत व्यथित होऊन हा व्हिडिओ बनवला आहे. याबद्दल बोलताना तो म्हणतो, माझे मित्र, अभिनेते अविनाश नारकर यांच्या ओळखीतून आम्ही आमचे खासदार गोपाळ शेट्टी यांनाही भेटलो. त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली. पोलीसांतही तक्रार केली. आमच्या विभागातल्या कस्तुरबा पोलिस स्टेशनच्या एसीपींनी बिल्डरच्या माणसाला बोलावून फसवणुकीची तक्रार दाखल करण्याची ताकीदही दिली. पण त्याचा काहीच फरक पडलेला नाही. आता गेल्या महिन्याभरापासून पाणी नाहीय. खासदारांनी लक्ष घातल्यावर बिल्डर फ्रेममध्ये आला. पण आता त्याच्या म्हणण्यानुसार इमारतीतल्या सर्वांनी तो मालमत्ता कर भरावा. आता फ्लॅट घेतानाच आम्ही ही सगळी रक्कम भरलेली होती. माझ्या फ्लॅटच्या पाण्याच्या कनेक्शनसाठी मी 98 हजार रुपये भरले आहेत. मेंटेनन्सही आम्ही आधी भरलेला आहेच. असे जवळपास एक कोटी आठ लाख बिल्डरकडे जमा झाले आहेत. बिल्डरने 2013 पासून मालमत्ता कर भरलेलाच नाही. तो भरल्यानंतरच पाण्याची लाईन दिली जाईल, असंही पालिकेनं सांगितलं आहे. असं असताना आता आम्ही पुन्हा रक्कम का भरावी? असा सवालही तो या व्हिडिओमध्ये करतो.


आता तर मी, माझं कुटुंब आणि आणखी एक रहिवासी हे इतरांना भडकवत असल्याचं हा बिल्डर सांगू लागला आहे. आता बिल्डर फोन करून धमक्या देतो. मेंटेनन्स भरा म्हणतो. एसेसमेंट टॅक्स भरा म्हणतो. आता प्रकरण सहनशीलतेच्या पलिकडे जात असून तुम्ही सर्वांना 'असे'ही बिल्डर असतात हे कळावं म्हणून मी हा व्हिडिओ करतो आहे असं तो सांगतो. या व्हिडिओमुळे पुढे काय होईल याची मला कल्पना नाही. माझ्या जीवाचं काही बरंवाईटही होऊ शकतं. मला माहीत नाही. पण तुम्हाला सावध करण्यासाठी आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचून यातून मार्ग निघावा म्हणून हा व्हिडिओ करत असल्याचं समीर सांगतो. 


मी जर पाण्यासाठी 98 हजार भरले आहेत. तर बिल्डरने आम्हाला अधिकृत पाण्याची लाईन का दिली नाही. आमच्या बिल्डिंगमध्ये ज्येष्ठ नागरिक आहेत. मुलं आहेत. महिला आहेत. काही कोव्हिड पेशंट आहेत. त्यांनी काय करायचं? असा सवालही तो विचारतो आहे. आपण सिनेमात माजोरडे बिल्डर बघतो. पण ते बिल्डर आपल्या आयुष्यात आल्यावर आपण काय करायचं?इतकंच नव्हे, आमच्या बिल्डिंगला ओसीही नाही. वॉचमनचे पगार नाहीत. याचे सगळ्याचे पैसे इथल्या रहिवाशांनी दिले आहेत. असं असताना बिल्डरने या सुविधा का दिलेल्या नाहीत, असंही त्याने या व्हिडीओमध्ये नमूद केलं आहे.