सातारा : 'आई माझी काळूबाई' मालिकेतील अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड-अलका कुबला यांच्यातील वाद आता खासदार उदयनराजे भोसले यांच्यापर्यंत पोहोचला आहे. सातारा चित्रीकरणाच्या सेटवर प्राजक्ता गायकवाड यांची नेमकी वस्तुस्थिती अलका कुबल यांनी उदयनराजे भोसले यांच्यासमोर मांडली. यानंतर उदयनराजेंनी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्यासोबत मोबाईलवरून चर्चा करुन हा वाद लवकरात लवकर मिटवावा, अशी विनंती केली.
काही संघटनांनी अभिनेत्री अलका कुबल यांनी प्राजक्ता गायकवाड यांची माफी मागावी आणि मालिकेतील प्रमुख कलाकार विवेक सांगळेला मालिकेतून काढून टाकावे. अन्यथा साताऱ्यात सुरु असलेलं मालिकेचं चित्रीकरण बंद पाडण्याची धमकी दिली आहे. यापार्श्वभूमीवर अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये आणि समीर आठल्ये यांनी आज उदयनराजे भोसले यांची त्यांच्या जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी भेट घेतली.
सहकलाकाराने शिवीगाळ केल्यानेच मालिका सोडली, अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचं स्पष्टीकरण
काय आहे प्रकरण?
प्राजक्ता गायकवाड ही मालिका मी सोडल्याबद्दल बोलताना म्हटलं की, अनेक ठिकाणी या मालिकेतून मला काढल्याची चर्चा होत आहे, जी चुकीची आहे. शिवाय, ही मालिका सोडताना मी ती एका दिवसात सोडल्याचाही प्रचार होतो आहे जो चूक आहे. मी मालिका सोडणार हे निर्मात्या अलका कुबल यांना मी सहा दिवस आधीच सांगितलं होतं. 31 ऑक्टोबर ही माझ्या चित्रिकरणाचा शेवटचा दिवस असणार आहे हे मी कळवलं होतं. चॅनलच्या एक्झिक्युटिव्ह प्रोड्यूसरलाही त्याची कल्पना होती. त्यानंतर ठरल्या तारखेला मी मालिका सोडली आहे. शिवाय, मला माझ्या सहकलाकाराकडून शिवीगाळ झाल्यानेच ही मालिका मी सोडली आहे. शिवीगाळ कुणी आणि कधी केली याबद्दल प्राजक्ताने विवेक सांगळे या कलाकाराचं नाव घेतलं आहे. ती म्हणाली, 'आशालता वाबगावकर यांच्या निधनानंतर मुख्य कलाकारांना घेऊन या मालिकेचं चित्रीकरण मुंबईत फिल्मसिटीत करायचं ठरलं होतं. त्यामुळे एका गाडीतून मी, माझी आई, विवेक आणि ड्रायव्हर असे निघणार होतो. त्यावेळी बोलताना विवेकने आपण अनेक कोरोना पेशंट्सना रुग्णालयात दाखल केल्याचं सांगितलं. साहजिकच, विवेकसोबत प्रवास करण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. कारण त्यावेळी आपण सगळेच काळजी घेत होतो. सेटवरही आधीच एका ज्येष्ठ कलाकाराचा मृत्यू ओढवला होता. त्यामुळे मी त्या गाडीतून येण्यास नकार दिला. त्यानंतर विवेकने थेट मला असभ्य भाषेत बोलायला सुरुवात केली. शिवीगाळही केली. इतकं झाल्यानंतरही मालिका चालू राहावी म्हणून मी चित्रीकरण सुरु केलं. पण सहकलाकार म्हणून त्याच्यासोबतचे सीन करताना माझ्यासोबत त्याने केलेली शिवीगाळ मला सतावू लागली आणि मग मी मालिका सोडायचा निर्णय घेतला. याची रीतसर कल्पना आणि तारीख मी निर्मात्यांना कळवली होती."
'आई माझी काळूबाई'मध्ये मोठा बदल, प्राजक्ता गायकवाडची जागा वीणा जगताप घेणार!
अलका कुबल यांनी याबाबत म्हटलं की, विवेक चांगला मुलगा आहे. त्याने अनेक कोरोना रुग्णांना मदत केली आहे. प्राजक्ता, तिची आई सोबत असताना तो फोनवर तिसऱ्याच माणसाला संतापाच्या भरात काही सुनावत होता. तशी त्याने शिवीगाळ आमच्यासमोर करायला नको होती असं प्राजक्ताचं म्हणणं होतं. आता प्राजक्ता हा मुद्दा वळवून विवेक आपल्यालाच शिव्या देत होता असं म्हणू लागली आहे. त्याचवेळी प्राजक्ता मात्र याचा साफ इन्कार करते. मुंबईला त्या गाडीतून जायलाा नकार दिल्यानंतर विवेकने आपला पाणउतारा करत शिवीगाळ केली असं ती स्पष्ट करते.