मुंबई : अभिनेता करण मेहराने आपल्याला अनेकदा मारहाण केल्याचा आरोप त्याची पत्नी आणि अभिनेत्री निशा रावलने केला आहे. इतकंच नाही तर करणचे विवाहबाह्य संबंध आहेत, असा दावाही तिने केला आहे. संपूर्ण प्रकरणावर माध्यमांशी बोलताना निशाने आपली बाजू मांडली.  


पत्नीला मारहाण केल्याच्या आरोपात टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेता करण मेहराला काल (31 मे) अटक करण्यात आली होती. त्याची अभिनेत्री पत्नी निशा रावलने सोमवारी (31 मे) रात्री करण मेहराविरोधात मुंबईत तक्रार दाखल केली. त्यानंतर गोरेगाव पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी करण मेहराला जामीन मिळाला आहे. आपल्याला अडकवण्यासाठी निशा रावलने स्वत:चं डोकं भिंतीवर आपटून घेतल्याचा दावा करण मेहराने केला आहे. आता या प्रकरणात निशा रावलने तिची बाजू मांडली आहे. 14 वर्षांच्या नात्यामध्ये करणने आपल्याला अनेकदा मारहाण केल्याचा आरोप निशाने केला आहे. इतकंच नाही तर करण मेहराचे विवाहबाह्य संबंध असल्यामुळेच घटस्फोटापर्यंत प्रकरण गेलं, असा दावाही तिने केला आहे.




 

सोमवारी रात्री घरात घडलेल्या प्रकाराची माहिती देताना निशा रावलने सांगितलं की, "करण बऱ्याच काळापासून चर्चा करत नव्हता. माझा भाऊ रितेश घरी आला होता. पोटगीची रक्कम ठरवावी यावर चर्चा सुरु होती. याचदरम्यान माझ्यात आणि करणमध्ये मोठा वाद झाला. यावेळी शिवीगाळही झाली. करण रुममधून बाहेर पडला. मीही जाण्यासाठी उठले तेव्हा त्याने माझे केस पडकून माझं डोकं भिंतीवर आपटलं. माझ्या डोक्यातून रक्त येत होतं."


करणचे विवाहबाह्य संबंध होते : निशा रावल
निशा रावलने सांगितलं की, "करणचे एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते, मी त्याचा याचे पुरावे दाखवल्यानंतर त्याने त्याच्या आयुष्यात आपल्याव्यतिरिक्त एक तरुणी असल्याचं मान्य केलं. मी आणखी जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्याचं उत्तर होतं की, "हो, माझं एका तरुणीवर प्रेम असून तिच्यासोबत फिजिकल रिलेशनमध्ये आहे. ती तरुणी दिल्लीतील आहे." 


हे माझ्यासाठी फारच धक्कादायक होतं. तरीही नातं टिकवण्यासाठी मी प्रयत्न करत होते, पण त्यालाच यात काही रस नव्हता. आपल्या कृत्याचा त्याला जरासाही पश्चताप नव्हता. त्यामुळे वेगळं होणं हेच योग्य असल्याचा विचार मी केला, असं निशा रावल म्हणाली.


...अखेर मी स्वत:साठी उभं राहण्याचा निर्णय घेतला : निशा
माझं अजूनही करणवर प्रेम असून लग्न टिकावं म्हणून मी प्रयत्न करत होते. त्याने अनेकदा मला मारहाण केली पण मी कधीही याची वाच्यता केली नाही. त्याची लोकांमध्ये 'नैतिक' ही प्रतिमा होती. त्यामुळे जर मी काही बोलले असते तर त्याला तडा गेला असता, त्याच्या कामावर परिणाम झाला असता. त्यामुळे पत्नी म्हणून मी कायम त्याच्या पाठिशी राहिले. परंतु सोमवारी रात्रीच्या प्रकारानंतर मी स्वत:साठी उभं राहण्याचा, लढण्याचा निर्धार केला. माझी आई कमकुवत आहे, असा विचार माझ्या मुलाने करु नये असं मला वाटतं. कोणीही एखाद्या मानसिक आणि शारीरिक त्रास देऊ शकत नाही, असं तिने पुढे सांगितलं.


दरम्यान निशा रावल आणि करण मेहरा यांना कविश नावाचा चार वर्षांचा मुलगा आहे. निशा रावल म्हणाली की, "मला माझ्या मुलाच्या भविष्याची आणि त्याच्या शिक्षणाची चिंता सतावत आहे. मुलाच्या ताब्यासाठीही करणने फारसा रस दाखवला नाही. उलट आपण कामात व्यस्त असल्याने कविशला आजी-आजोबांकडे ठेवण्याचा सल्ला त्याने दिला होता."